आशाताई बच्छाव
हवेली /पुणे श्री संजय वाघमारे, माझी आई “कौशल्या” आज मातृदिनाच्या निमित्ताने थोडसं आयुष्य आईसाठी काढूया, आई म्हणजे काय असते दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लहान लेकराची माय असते, मोठ्या लेकरांची आदरशीला असते, आई ही मार्गदर्शक, गुरु त्याचबरोबर मुलगा चुकला तर त्याला कठोर शिक्षा करणारी एक शिक्षिकाही असते. असे अनेक प्रकारचे गुण मी माझ्या आई मध्ये लहानपणापासून पाहिलेले आहेत. तसे पाहिले तर माझी आई अशिक्षित, तिला शिक्षणाचा अ सुदा येत नाही. परंतु ती खूप हुशार आहे.तिने तिच्या आयुष्याच्या अनुभवाच्या शिदोरीतून मुलांना खूप चांगलं घडवलं, शिकवलं,चांगले संस्कार दिले. जीवनात जगत असताना संस्कार म्हणजे काय हे मी खूप वेळा अनुभवलेला आहे कारण अनेक वेळा आपल्याला जगत असताना अशा काही अडचणी म्हणा किंवा वेळ प्रसंग म्हणा की त्यामध्ये काय बोलावे, कसे बोलावे, शब्द कसे वापरावे ह्या गोष्टी मधून आपण त्या अडचणीतून त्या वेळ प्रसंगातून कसे बाहेर पडू हे या संस्कारातून मला अनेक वेळा पाहायला मिळाले आहे. हे श्रेय जातं फक्त माझ्या आई “कौशल्या ” हिला. माझ्या आई-वडिलांनी खूप गरीब पाहिलेली आहे.त्या गरिबीतून कसं जगायचं थोड्याशा नीटनेटच्या पैशातून कसं घर चालवायचं व मुलांना किती आनंद ठेवायचं हे यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला जगायला दिल. एवढी गरिबी असताना सुद्धा लहानपणी आम्हाला कधी कळुही दिला नाही की आम्ही गरीब आहोत. माझ्या आई-वडिलांकडे कला होती ती कला म्हणजे मुलं चुकली तर त्यांना हाणायचं नाही परंतु शाब्दिक मार कसा द्यायचा व त्या शब्दांमध्ये ते कसे गुंतले पाहिजेत हे या कलेमुळे त्यांनी आमच्यावरती खूप चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न नेहमी केला. माझ्या शिक्षण चांगले व्हावे व मुलगा नोकरी लागावा त्यासाठी त्यांनी अनेक कावड कष्ट केली मेहनत केली घाम गाळला परंतु त्याचे फळ आज या ठिकाणी मला जगत असताना पाहायला मिळते.आई विषयी काय काय लिहावे रात्रंदिवस विचार केला तरी कमीच पडेल एवढं आईने या जीवन जगत असताना आमच्यासाठी केले. मी जे जीवन आता सुंदर व संस्कारी पद्धतीने जगत आहे या जीवनाचे सर्व श्रेय मी फक्त माझ्या आई वडील यांना देतो. त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतोय. आज या मातृदिनाच्या दिवशी मी माझ्या आईचे चरण स्पर्श करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की मी तिच्या पोटी जन्म घेतला आणि सार्थक झालो.