आशाताई बच्छाव
काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात
उपकार करून रस्त्यावर ठेवायचे असतात ही मंजरी प्रचलित असली तरीही उपकार करणाऱ्याची आभार मानणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण उपकार करणारा निस्वार्थपणे व अडचणीच्या वेळेस आपली मदत करून आपल्याबद्दल सहानुभूतीची भावना ठेवत असतो. ‘उपकार फेडायचे नाहीत’ या वाक्याला दोन सावल्या आहेत. त्यातली पहिली सावली म्हणजे ‘काही उपकार सदैव स्मरणात ठेवायचे असतात’ ही आणि दुसरी सावली म्हणजे ‘कोणतेच उपकार विसरायचे नसतात’ ही ! खरंच काही उपकारच असे असतात, की त्यांची परतफेड होवू शकत नाही. असे उपकार फेडून विसरून जाण्यापेक्षा त्या उपकारांची जाणीव ठेवून त्याच प्रकारची मदत दुसऱ्याला करणे हीच खरे तर उपकारकर्त्या प्रतिची कृतज्ञता असते. परंतु अलीकडे कृतज्ञतेची जाणीव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देवून बाजूला केलं जातं. ज्या जिन्याने वर चढता येणे शक्य होते, त्या जिन्याचाच विसर पडतो आणि या घटनाक्रमाला जगरहाटी म्हणण्याची हिणकसता बऱ्याच वेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.
माझ्यावर झालेले माझ्या मात्यापित्यांचे, गुरूंचे व्यक्तिगत वाटचाल करीत असतांना सभोवतीच्या असंख्य ज्ञात अज्ञात लोकांचे उपकार हे माझ्या स्मरण कप्प्यातील एक सुगंधी भाग असून त्यावर मी माझ्या सदसद्विवेक बुद्धीचे सम्यकपणे भरणपोषण करीत आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले माणूसपण जिवंत ठेवणे होय. आणि या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत, हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. उपकार फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, हा मौलिक विचार आजच्या घडीला सर्वांसाठीच कमालीचा उपयुक्त आहे, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल?
रामभाऊ आवारे
प्रदेश कार्याध्यक्ष वारकरी मंच महाराष्ट्र राज्य