
आशाताई बच्छाव
महाशिवरात्रीची संपुर्ण माहिती
महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण आहे. जो माघ कृष्ण चतुर्दशीला आपण साजरा करत असतो. तसे महाशिवरात्रीचे महत्व इतके मोठे आहे की, महाशिवरात्रि ही प्रत्येक जण आपण शिवपुराण काळापासून ते आतापर्यंत साजरे करीत आहोत. भगवान शिव हे चतुर्दशी ह्या तिथीचे स्वामी आहेत. त्यातच ज्योतिष शास्त्रात हे व्रत शुभ फलदायी असते असे समजले जाते. तसे पाहिले तर शिवरात्री ही दर महिन्यात येत असते. परंतु माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. यादिवशी शैव पंथीय भगवान शंकराची आराधना करतात. दुसर्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शिवशंकरांनी रौद्र रूप धारण करत तांडव केले होते तीच ही रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र. दुसर्या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाल्याने या रात्री जागरण केल्याने पुण्यफळ मिळते. दिवसभर उपवास करून व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होत असल्याची मान्यता आहे. तिसर्या एका आख्यायिकेनुसार पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस मानला जातो. या रात्री भगवान शिव विश्रांती घेतात. त्यांच्या या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री म्हटले जाते. सूर्योदय हे सुद्धा उत्तरायानात आलेले असतात व ह्या दरम्यान ऋतू परिवर्तन सुद्धा होत असते. अशाच या शुभ समयी महाशिवरात्रीत पूजन केल्याने आपल्याला इच्छा फलप्राप्ती होत असते. ज्योतिष शास्त्रानुसार कृष्ण पक्षातील चतुर्दशी ला चंद्र ही बलहीन स्थितीत असतो. माघ महिना उगवला शिवरात्र येऊ लागले की घरातील मोठी माणसं शिवलीलामृत, काशीखंड यासारख्या ग्रंथाचे वाचन सुरू करत असतात, तर कोणी ओम नमः शिवाय या पंचअक्षरी मंत्राचा जप करीत असतो. कोणी हौशी मंडळी या महाशिवरात्री पर्वणी साधून बारा ज्योतिर्लिंगांना भेट देत असतात. तर या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेलपत्र वाहने, उपवास करणे इत्यादी गोष्टी या आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे निश्चितच कल्याण होत असते . त्याला ज्ञान प्राप्त होते .त्याला फलप्राप्त होते .त्याला उत्कर्षाचा मुक्तीचा विकासाचा हा मार्ग सापडत असतो. महत्त्वाचं म्हणजे शिव उपासनेमुळे माणसाच्या दुष्ट प्रवृत्ती कशा बदलतात? सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो? याबद्दल शिवलीलामृत मध्ये एक कथा आहे आणि ती शिवपुराण पासून आपण ऐकत असतो आणि त्या माणसाचे सुद्धा दृष्टिकोन, विवेक, सदाचार कसा खऱ्या अर्थाने बदलला हे त्या शिवलीलामृत मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. तर ती कथा अशी आहे. असाच एक महाशिवरात्रीचा दिवस गुरुद्रुह पारधी शिकार करायचे म्हणून जंगलात गेला होता. एका वृक्षावर जाऊन बसला होता. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादा सावज आलं की त्याचे ते शिकार करायची हा त्याचा हेतू होता. दुपारपासून धनुष्यामध्ये बाण सज्ज करून तो बसला होता. पण दिवस गेला. सायंकाळ झाले. सूर्य अस्ताला गेला. तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एकही प्राणी आणि शिकार त्याला काही मिळाली नाही. तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी तिथे आली. तेवढ्यात पारध्याने धनुष्याची दोरी मागे घेतली. तो आता बाण सोडणारच तोच त्या हरिणीचा प्रमुख पुढे आला आणि त्या पारध्याला म्हणाला, हे पारध्या तू शिकारी आहे? शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हेही खरं! पण त्या आधी आमची एक विनंती ऐक आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबीयांना भेटून येतो. मग तू आम्हाला मार .खरं तर हातात तोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची? पण त्या हरणीच्या प्रमुखान परत यायचं वचन दिल, तेव्हा पारधी म्हणाला ठीक आहे. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आल पाहिजे. हरनीच्या कळपानी ते मान्य केलं. आणि ती निघून गेली. त्याला उपास घडला. आता रात्र कशी काढायची? तोच दूरवरच्या मंदिरातून एक घंटा नाद ऐकू आला. पाठोपाठ ओम नमः शिवाय नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या झाडावर बसला होता त्याची तो पाने तोडून खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारर्ध्याकडून नेमकी शिवपिंडावर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा शिवरात्रीच्या दिवशी घडत होती. सूर्योदय झाला . तोच हरीण पुढे आले आणि म्हणाले पारध्या सोड बाण मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. इतक्यात एक हरीण म्हणाले, “त्याला नको, मला मार तो माझा पती आहे त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पुर्ण करू दे”. तेवढ्यात ती पाडस पुढ आणि ती म्हणाली,” त्या दोघांच्या अगोदर आम्हाला मार, ते आमचे आई-वडील आहेत”.अशा प्रकारे एकापाठोपाठ एकापाठोपाठ एक अशी एक दुसऱ्यांना वाचवायची व कर्तव्यदक्षतेची चढाओढ पारध्याने पाहिली. अन् विचार केला हे प्राणी आपले धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये ! त्यांचे शिकार करून मी का पापाचा धनी होऊ? त्याने सगळ्यांना जीवनदान दिलं. तेवढ्यात तेथे भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरीणीला मृग नक्षत्र आणि पारर्ध्याला वाघ्र नक्षत्र म्हणून कायमचे आकाशात स्थान दिले. हे असे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा. म्हणून हा दिवस इतका महत्त्वाचा आहे की शिवरात्रीच्या दिवशी पूजा अर्चा जे काही आपण करू ते आपल्याला इच्छित फल प्राप्त होत असते . त्या पारध्याला खाली पिंड आहे हेही माहित नव्हते. आपण कोणत्या झाडावर बसलोय हेही माहित नव्हते आणि विशेष म्हणजे तो शिकारी होता. एवढं सगळं असून सुद्धा त्याच्या हातून शिवपिंडीची पूजा झाली म्हणून त्याला मोक्ष प्राप्त झाला. आपल्याला तर महाशिवरात्रीचे महत्त्व सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्री पूजन हे आवर्जून केलेच पाहिजे. सविता तावरे स्पेशल रिपोर्टर मुंबई