राजेंद्र पाटील राऊत
संपादकीय अग्रलेख….
मराठा आरक्षण आणि आंदोलनाची दिशा व दशा!
वाचकहो,
सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उभा महाराष्ट्र पेटून उठलाय.ठिकठिकाणी साखळी उपोषणे,बेमुदत आंदोलने सुरु झालीत,हि जरी समाजासाठी भुषणावह बाब असली तरी यानिमिताने का असेना समाज एकत्रित आला हे बघून समाधान वाटले.या देशात आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलने करणे हा प्रत्येक नागरीकांचा हक्क व अधिकार आहे.मात्र गेल्या काही दिवसापासून आम्ही बघत आहोत की,या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ठिकठिकाणी गाडयाची तोडफोड करणे,दगडफेक करणे असे जे प्रकार सुरु आहेत.ते सुसंस्कृत महाराष्ट्राला अशोभनीय आहेत.छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात रयतेच्या काडीलाही हात लावू नका हि शिकवण देणाऱ्या महाराजांच्या महाराष्ट्रात आपण कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहोत याचे भान समाजबांधवानी जरुर ठेवावे. त्याशिवाय महत्त्वाचा मुद्दा या देशात लोकशाही आहे.त्यामुळे गावबंदी कायद्याने कुणालाच करता येत नाही.येथून ब्रिटीश जाऊन कैक वर्ष लोटलीत तरी आम्ही अजूनही त्याच त्याच जुन्या बुरसटलेल्या कायद्यावर गावबंदी करीत आहोत.तस बघितलं तर जातपंचायती बसवून कुणा राजकीय नेत्याला,आमदाराला खासदाराला अथवा मंत्र्याला गावबंदी करण्याचा नैतिक अधिकार आम्हांला मुळीच नाही.कारण या राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधली गेलेली राजकीय बांडगुळ प्रत्येक गावागावात घराघरात आज आपल्याच समाजातील स्वार्थासाठी लाचार झालेली सतापिपासू आहेत.म्हणून मग अगोदर गावातील राजकीय भामटयांपासून या गावबंदीला सुरुवात झाली पाहिजे.मराठा समाजाचे आरक्षण मिळविणे तेवढे सहजसोपे नाही.समुद्रातून सुई शोधून काढण्यासारखा हा प्रकार आहे.मराठा समाजाचे आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकदा आंदोलने झालीत.कित्येकांचे बळी गेलेत.मराठावीर शुरवीर स्वर्गिय अण्णासाहेब पाटील या एकमेव मराठा आमदाराने स्वतःच्या डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली त्यालाही कैक वर्ष लोटलीत.पण आरक्षणाचा मुद्दा का सुटत नाही.हे सत्य कुणीच नाकारु शकत नाही.आज या निमिताने का असेना मराठा समाज संघटीत झाला एकत्रित आला हि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.किंवा वर्षापूर्वी सुध्दा कोपर्डीच्या श्रध्दाताईच्या निमिताने मराठा समाज एकत्रित आला.”एक मराठा लाख मराठा” म्हणत हे राज्यच नव्हे तर देश विदेशातही अत्यंत शांततेच्या मार्गाने मोर्च काढून मराठा समाजाने आपल्या शांतताप्रिय गुणधर्माचे दर्शन घडवून दिले.कोपर्डीच्या श्रध्दाताईच्या घरी आम्ही जेव्हा प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा कळाले काय झाले त्या प्रकरणाचे? मोठमोठी आंदोलने करुन समाजाला एकत्रित करणारे आता नेमके कुठे आहेत?श्रध्दाताईला न्याय मिळाला का? हे सगळे प्रश्न आता अडगळणीत पडले आहेत.श्रध्दाताईच्या आईने तर समाजाविषयी चकार शब्द बोलायला नकार दिला होता.काय असेल यामागचे कारण!याचे आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.मराठा समाज वेगवेगळ्या ९६ जातीत विखुरला गेलेला आहे.त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळविणे किंवा आरक्षण प्राप्त करुन हे पाहिजे तेवढे सोपे नाही.डोंगर पोखरुन उंदीर काढण्यासारखा हा प्रकार आहे.आज गावागावात जे समाजाच्या नावाने आंदोलने करताहेत हेच राजकीय टोळभैरव थोडयाच दिवसानंतर होऊ घातलेल्या निवडणूकांमध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन पोपटपंची करून जय हो चा जयघोष करताना दिसतील.
वाचकहो,
आम्ही देखील गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून मराठा समाजाच्या चळवळीत सक्रीय सहभागी आहोत.महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अठरा पगड जातीच्या विकासासाठी हि संकल्पना सोबत घेऊन लढत आहोत.पण मुळ मुद्दा हा आहे की,राजकीय पक्षाच्या दावणीला बांधल्या गेलेल्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करुन आजवर जगलो नेत्यांसाठी आता जगणार जातीसाठी अशी शपथ घेऊन खरेपणाने कार्य केले तरच या मराठा आरक्षणाचा जटील समस्येचा काही तरी सोक्षमोक्ष लागू शकतो.एव्हढेच!