आशाताई बच्छाव
आमदार महेश लांडगे यांचे सर्वस्तरातून कौतूक..! मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार लांडगे यांची ५ लाख रुपयांची मदत
सातारा ( अंकुश पवार, ठाणे/सातारा जिल्हा अध्यक्ष तथा प्रतिनिधी)
जगभरातील मराठा बांधवांना संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्याच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करुन ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला.
मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे समस्त मराठा समाजासह पिसाळ कुटुंबियांचे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबियांच्या घरी भेट दिली आणि सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला. प्रवीण पिसाळ यांनी मराठा समाजातील तब्बल एक कोटीहून अधिक तरुणांचे भक्कम संघटन उभे केले आहे. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे महाराष्ट्रभर तसेच देश विदेशातील मराठी तरुणांनाही प्रेरणा व बळ मिळाले आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा त्यांचा लढा समाजाला दिशा देणारा आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर केलेली मदत अविस्मरणीय आहे. कुणालाही कधीही कसलीही मदत लागली, तर प्रवीण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे पिसाळ कुटुंबियांच्या पाठीशी राहणे, हे आपले कर्तव्य आहे, अशा भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या.