आशाताई बच्छाव
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेला भोगाव येथे प्रारंभ शेतकऱ्यांनी मोहिमेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन
•जिल्हाधिका-यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा
शत्रुघ्न काकडे पाटील-:जिल्हा प्रतिनिधी
परभणी:-दि.९ :– राज्य शासनाच्या गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार या मोहिमेला आज परभणी तालुक्यातील मौजे भोगाव येथे प्रारंभ झाला असून, ही मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय जैन संघटना, जिल्हा परिषदेचे जिल्हा मृदा व जलसंधारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्ररथाला जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियानाचे सदस्य सचिव कविराज कुचे यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष नीरज पारख, जिल्हाध्यक्ष रोहीत गंगवाल, राजेश अंभुरे, विजय काला, मुकेश जैन यांच्यासह इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
दिवसेंदिवस पर्जन्यमानातील बदलामुळे अवेळी व लहरी पाऊस पडत असून, अनेकदा दुष्काळाचे सावट निर्माण होत आहे. त्यामुळे शेती, जनावरे आणि पिण्यासाठीही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. त्यामुळे राज्य शासन, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था आणि शेतकरी मिळून याचा खंबीरपणे सामना करण्यासाठी राज्य शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेला मुदतवाढर दिली असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने मे २०१७ रोजी ही योजना तीन वर्षांसाठी राबविणे सुरु केले होते. या योजनेची मुदत मार्च २०२१ अखेर संपली होती. मात्र, शेतकरी हिताच्या योजनेला पुन्हा शासनाने मुदतवाढ दिली असून, या योजनेतून सर्वसामान्य शेतकऱ्यांना धरण किंवा तलावातील गाळ काढून देण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च करण्यात येणार आहे. गाळ उपसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च दोन्ही मिळून ३१ रुपये प्रती घन मिटर यानुसार असणार आहे. गाळ वाहून नेण्यासाठी विधवा, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पसरविण्यात आलेल्या गाळाच्या ३५.७५ प्रती घनमीटर प्रमाणे एकरी १५ हजार रुपयांच्या मर्यादेत राहणार आहे. हे अनुदान एक हेक्टर क्षेत्रफळासाठी ३७ हजार ५०० रुपये इतके राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा सुपिक गाळ शेतात टाकण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती गोयल यांनी केले आहे.
भारतीय जैन संघटनेमार्फत शेतकऱ्यांची मागणी आणण्याचे काम करण्यात येणार असून, त्यासाठी आजपासून चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी अशासकीय संस्थांकडून अर्ज मागविले जाणार असून, संस्थेची क्षमता तपासणी करूनच निवड व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काम सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समितीकडे प्रस्ताव सादर करायचे आहेत. त्यात आपल्या गावातील जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाच्या प्रमाणाचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. गावाजवळील जलस्त्रोतांमधील गाळ काढण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेणे बंधनकारक असून गावातील नागरिकांना याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे.
परभणी तालुक्यातील जाम बुद्रुक व जाम खुर्द येथे ५ मे रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे येथील लघु पाटबंधारे विभागाच्या तलावातील १० हजार क्युबिक गाळ नेण्यास २० शेतकऱ्यांनी होकार दिला असून, आज भोगाव येथे गाळ काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. भोगाव येथील तलावातील गाळ काढण्यासाठी २.२७ लक्ष रुपये अंदाजित किंमत असून, येथील तलावात ३९० सघनमीटर साठवणूक क्षमता आहे. तर येथील पाण्यातून ८४ हेक्टर अप्रत्यक्ष सिंचन होते. या तलावात ४४ हजार घनमीटर गाळ असून यापूर्वी लोकसहभागातून १४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर सध्या येथील तलावात ३० हजार घनमीटर गाळ असून ७५ एकर शेती गाळामुळे सुपिक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होते शेतात गाळ नेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.