आशाताई बच्छाव
संतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केले कोकण रेल्वेचे चलचित्र
रत्नागिरी,(सुनील धावडे)- रत्नागिरी येथील औद्योगिक वसाहतीत राहणारे फर्निचर व्यवसायिक संतोष माचकर यांनी गणेशोत्सवानिमित्ताने तयार केलेल्या कोकण रेल्वेच्या चलचित्राने रत्नागिरीसह जिल्हाबाहेरील अनेकांना भुरळ घातली आहे. अत्यंत आकर्षक पद्धतीने हे चलचित्र संतोष माचकर यांनी तयार केले आहे. अनेकांनी हे चलचित्र पाहून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संतोष माचकर यांनी प्रथम रत्नागिरीतील परटवणे येथील राहत्या घरी कोकण रेल्वेचे चलचित्र बनविले होते. गणेशोत्सव कालावधीत संतोष माचकर हे दरवर्षी चलचित्र बनवितात. गेली ३५ वर्षे ते हे काम करत आहेत.
फर्निचर व्यवसायानिमित्त संतोष माचकर हे सध्या एमआयडीसी येथे राहण्यास गेले. त्यामुळे यावर्षी याचठिकाणी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले. यावर्षी कोणता देखावा करायचा असा विषय पुढे आला. मुलांनी कोकण रेल्वेचे चलचित्र करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा हे चलचित्र बनविले. ते तयार करण्यासाठी १५ दिवस लागल्याचे संतोष माचकर यांनी सांगितले. रत्नागिरी येथील एमआयडीसीमधील प्लॉट नंबर सी-१९०, फिनोलेक्स कॉलेजमागे याठिकाणी संतोष माचकर राहतात.