आशाताई बच्छाव
धर्मशास्त्राच्या उपक्रमांसाठी संस्थांचा एकत्रित आराखडा हवा- प्रो. विजयकुमार मेनन
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : धर्मशास्त्रावर संस्कृती आधारित आहे. त्यामुळे धर्मशास्त्राच्या आधारावरच भारताचे नवीन शिक्षण धोरण पुढे न्यावे लागेल. त्याकरिता वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत संस्थांनी सामंजस्य करार करून एकत्रित कार्य करावे लागेल. धर्म, संस्कृती व त्यातून चारित्र्यावान पिढी घडवण्यासाठी रोड मॅप तयार करावा लागेल. आपण काय करणार याचा आराखडा करावा लागेल. आजच्या धर्म परिषदेतून हे साध्य होणार आहे, असे प्रतिपादन उज्जैन येथील महर्षि पाणिनी संस्कृत वैदिक विश्वविद्यालयाचे कुलपती प्रो. विजयकुमार मेनन यांनी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहामध्ये धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रो. मेनन म्हणाले की, संस्कृती, धर्माच्या माध्यमातून पुननिर्माण करायचे आहे. आगामी काळात यासाठी छोट्या छोट्या गटांची निर्मिती करा. प्राचीन भारतीय परंपरांवर आधारित ग्रंथरचना, पाठ्यपुस्तक निर्मिती करण्याची गरज आहे. प्राचीन ग्रंथसंपदा व आधुनिक ज्ञान, विज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. हे मूलभूत कार्य करण्यासाठी युवा पिढीने पुढे येणे आवश्यक आहे. संस्कृतमधील ग्रंथांवर आधारित ज्ञान आत्मसात करावे. भौतिक विकास हा एका पतंगाप्रमाणे असतो. तर संस्कृतीवर आधारित विकास हवा. कारण तोच शाश्वत आहे. धर्म परिषद रत्नागिरीसारख्या ठिकाणी होणे ही गौरवशाली बाब आहे. यामुळे रत्नागिरीतूनही धर्मशास्त्रात विद्वान, विदुषी तयार होतील. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या कामानिमित्त मी यापूर्वी गोगटे महाविद्यालयात आलो आहे. इथले आदरातिथ्य नेहमीच चांगले असते.
कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय व भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र उपकेंद्र आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. सिद्धांत नॉलेज फाउंडेशन आणि संस्कृती संवर्धन व संशोधन प्रतिष्ठानचे या परिषदेला सहकार्य लाभले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी न्यायव्यवस्थेबद्दल मांडलेल्या विचारांबद्दल आणि ते मूळचे रत्नागिरी येथीलच असल्यामुळे ही संपूर्ण परिषद त्यांना समर्पित करण्यात आली.
डॉ. काणे कायदेशीर धर्मगुरु
मनोगत व्यक्त करताना कोकिला कालेकर म्हणाल्या की, धर्म संस्थापनेसाठी भारतामध्ये अनेकांनी कार्य केले आहे. स्वामी विवेकानंद हे आध्यात्मिक धर्मगुरु होते. त्याचप्रमाणे महामहोपाध्याय भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे हे कायदेशीर धर्मगुरु होते. धर्म परिषदेच्या निमित्ताने आपण या मार्गावरून जात आहोत. अशा उपक्रमांतून भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, अशी खात्री वाटते.