• Home
  • शैक्षणिक क्षेत्रातील हिरा- प्रेरणा सुर्य श्री.अशोक गंगाधरराव पवळे

शैक्षणिक क्षेत्रातील हिरा- प्रेरणा सुर्य श्री.अशोक गंगाधरराव पवळे

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220331-WA0004.jpg

शैक्षणिक क्षेत्रातील हिरा- प्रेरणा सुर्य श्री.अशोक गंगाधरराव पवळे

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

“साध्या राहणीला यांच्या
चढलेला बुद्धीचा साज,
लकला आणि सृजनशीलता
यांच्या शैक्षणिक कार्याचे राज,
नांदेड पतपेढीच्या माध्यमातून
गरजूंच्या मदतीला धावले निर्व्याज,

‘ ग ‘ ची बाधा नसलेल्या अधिकाऱ्याने
स्वीकारावे आमचे अभिवादन आज… “
नायगाव पंचायत समितीचे विद्यमान कार्यकुशल गटशिक्षणाधिकारी, विद्यार्थी व शिक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, नंदादीपाप्रमाणे अखंड ज्ञानरुपी प्रकाशाने इतरांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी कधी अष्टपैलू शिक्षक तर कधी प्रेरक अधिकारी म्हणून कार्याची ज्योत तेवत ठेवणारे प्रेरणासूर्य श्री.अशोक पवळे साहेब दि.31-03-2022 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
” कोणत्याही व्यक्तीला श्रेष्ठत्व त्याच्या जन्माने नाही तर कर्तृत्वाने मिळते” या उक्तीचा अर्थ म्हणजे आपले पवळे साहेब. ‘कोपरा ‘ हे गाव नायगाव तालुक्यात कुठे आहे, यापासून अनभिज्ञ असलेल्या नांदेड जिल्यातील अनेकांना या गावाची ओळख आज झालेली आहे ती म्हणजे पवळे सरांची जन्मभूमी म्हणून ! 11 मार्च, 1965 रोजी ‘कोपरा’ या छोट्या खेड्यात, एका शेतकरी कुटुंबात पवळे सरांचा जन्म झाला. शिक्षणाविषयी आवड असल्याने आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर परिश्रमाचे वल्हे करून पवळे सरांनी शैक्षणिक यशाचा किनारा गाठला.
28 नोव्हेंबर, 1985 रोजी प्रा. शा. मंगनाळी, ता. कंधार येथे शिक्षक म्हणून नियुक्त झाले. तेव्हांपासून आजतागायत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. शाळेकडे विद्यार्थ्यांची पाऊले वळावी म्हणून वृक्षारोपण करून शाळा झाडे आणि फुलांनी बहरवल्या, शाळेमध्ये भौतीक सुविधा निर्माण केलेल्या आहेत.
सरांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदस्थ आहेत. शाळा आणि विद्यार्थी घडवताना त्यांनी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त वेळ देण्यास कधीही संकुचितपणा दाखविला नाही.
“अथांग ज्ञानरुपी समुद्राला
समाजकार्याची उधाण भरती,
पौर्णिमेच्या प्रकाशासम निर्मळ मन
समस्यांचा काळोख सर्वांच्या संहारती….”
स्वतःबरोबरच इतरांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी फार कमी व्यक्ती प्रयत्न करतात त्यापैकीच नांदेड जिल्ह्यातील सर्वसामान्यांपासून ते उच्च वर्गातील प्रत्येकाच्या ओठी येणारे एक नाव म्हणजे “अशोक पवळे सर “. हार्मोनियम वादन, गायन, वक्तृत्व, सूत्रसंचालन अशा अनेक रंगांची उधळण आणि रुजवण करणारे पवळे सर !
पदोन्नत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी या विविध अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आमचे साहेब शिक्षकांना पथदर्शक होवून प्रोत्साहन देत राहिले.
पाहून हा ज्ञान सागर
मनामनात वाढत राहिला आदर,
रुबाब नाही कधीही वागण्यात,
जरी गेला कीर्तीचा वेलू गगनावर….”
2019-20, 2020-21 या वर्षांमध्ये केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असताना कोरोनाच्या वादळावर गरुडासम स्वार होवून शिक्षणाचा प्रवाह चिमुकल्यांपर्यंत कसा पोहचेल याचा ध्यास घेणारे पवळे साहेब सर्वांना अवगत आहेत. व्हाट्सएप ग्रुप बनवणे, ऑनलाईन तास घेणे, शिक्षकमित्र नेमणे यासाठी शिक्षकांचा कणा बनणारे पवळे सर ! नांदेड जिल्हा शिक्षक पतपेढीचे चेअरमन पद भूषवताना कणभरही स्वार्थ न ठेवता शिक्षकांच्या आर्थिक समस्या जाणून घेवून कार्य करणारे, गरजवंतांना निस्वार्थ प्रकाश देणारे प्रेरणासूर्य म्हणजे पवळे सर !
प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षकाच्या आयुष्यरूपी वृक्षाला शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक यशाची पालवी बहरावी आणि आनंदाचा गारवा पसरावा यासाठी वसंत ऋतुप्रमाणे नवनिर्मितीची सृजनशक्ती असणारे, कृतिशील, निगर्वी अधिकारी नायगाव तालुक्याला लाभले हे आमचे भाग्य समजतो. पवळे साहेब आपण शैक्षणिक, सामाजिक कार्यात असेच कार्यशील रहावे. समाजाच्या हितासाठी धडपडणाऱ्या तुम्हांला दीर्घ आयुष्यात आरोग्य, आनंद लाभो याच शुभेच्छा आज सर्वत्र घुमत आहेत.
“अविरत केली पादाक्रांत यशाची शिखरे,
भिरभिरली ना मनी कधीही अहंकाराची पाखरे,
उभारली सदैव माणुसकीची घरे
‘उदार महात्मा’ शब्दाचे तुम्ही मानकरी खरे,
दीर्घ आयुष्यात तुमच्या खळाळावे हर्षाचे झरे,
शुभेच्छा देतात या लाख मन बावरे….

— मुख्याध्यापक व सर्व शिक्षक
जि.प.प्रा.शा.मोकासदरा केंद्र गडगा

anews Banner

Leave A Comment