सेन्सेक्स मध्ये ३०० अंकाची वाढ तर निफ्टीतही ८० अंकाची लाभ तर आजच्या तेजीने गुतंवणुकदारांची झाली ५० हजार कोटींची कमाई
प्रतीनिधी/ राजेशNभांगे
Mumbai –
भांडवली बाजारात आज गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा जोरदार खरेदी सुरु केली आहे. आज गुरुवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची वाढ झाली तर निफ्टी ८० अंकांनी वाढला आहे. आजच्या तेजीने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत ५० हजार कोटींची वाढ झाली आहे.
आजच्या सत्रात बँका, रियल इस्टेट कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी आहे. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २२ शेअर तेजीत आहेत तर ८ शेअरमध्ये घसरण झाली आहे. पाॅवरग्रीड, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, बजाज ऑटो, टाटा स्टील, एचसीएल टेक, एल अँड टी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एनटीपीसी, टायटन, एसबीआय, टीसीएस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. नेस्ले, एचडीएफसी, इंडसइंड बँक,एचयूएल , एशियन पेंट, कोटक बँक, डॉ. रेड्डी लॅब, सन फार्मा हे शेअर घसरले आहेत.
स्थावर मालमत्ता क्षेत्रात आज शोभा, ओमेक्स, इंडियाबुल्स रियल इस्टेट, सनटेक रियल्टी आदी शेअर वधारले आहेत. सियामच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४ टक्के वाढ झाली. याचा फायदा आज ऑटो शेअरला झाला. आज बाजारात बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
मागील काही सत्रात बाजारातील तेजी पाहून किरकोळ गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगायला हवी. सध्या ज्या घडामोडी घडत आहेत त्याने स्मॉल कॅप्स आणि मिड कॅप्स शेअरमध्ये ३.५ टक्के ते ६ टक्के घसरण झाली असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक तज्ज्ञ डॉ. व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.
सध्या सेन्सेक्स २९८ अंकांनी वधारला असून तो ५४८२४ अंकावर ट्रेड करत आहे. तर निफ्टी ७९ अंकांनी वधारला असून तो १६३६१ अंकावर आहे. काल बुधवारी सेन्सेक्समध्ये २८ अंकांची घसरण झाली होती. तर निफ्टीमध्ये २ अंकांची किरकोळ वाढ झाली होती.