नांदेड पोलीस कल्याण निधी अंतर्गत नांदेड पोलीस पेट्रोल पंपाचे उदघाटन, वेल्फेअरसाठी होणार फायदा
नांदेड प्रतिनिधी / राजेश भांगे
पोलिस दलातील अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध कल्याणकारी योजना पोलिस कल्याण निधीतून राबविण्यात येतो.
या निधीत मोठ्याप्रमाणात आर्थीक उलाढाल झाली तर विविध योजना व कार्यक्रम राबविण्यासाठी मध्यवर्ती पोलिस कल्याण मंडळाच्या धोरणाविषयी निर्देशाचे अधीन राहून पोलिस कल्याण निधीमध्ये वृद्धिंगत करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या संकल्पनेतून स्नेहनगर पोलिस वसाहत परिसरात पेट्रोल पंप सुरु करण्यात आला आहे.
पेट्रोल पंपाचे बुधवारी सात जुलै रोजी दुपारी उद्घाटन करण्यात आले. पोलिस कल्याण निधीमध्ये रोकड असल्यास अधिक सक्षमपणे पोलिस अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी कार्य करता येईल. सदर पेट्रोल पंपावर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल उपलब्ध करुन देण्यात आले असून चार मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मशीन महिलांना पेट्रोल भरण्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
सदर मशीनचे उद्घाटनसुद्धा महिला प्रतिनिधीकडून करण्यात आले असून पंपावर महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पेट्रोल भरणाऱ्या वाहनांमध्ये मोफत हवा चेक करण्याची मशीन बसविण्यात आली आहे. पोलिस दलातील पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व अंमलदार यांना सवलतीच्या दरात घर उपयोगी साहित्य मिळण्यासाठी पोलिस कॅन्टीन, गॅस एजन्सी, एलआयसी, पिठाची गिरणी, वाचनालय, पोलिस क्लब, व्यायाम (जीम) शाळा, पोलिस लॅान, प्राथमिक शाळा, पाळणाघर, पोलिस दवाखाना, सार्वजनिक लसीकरण, उर्जिता उपहारगृह, गाळे वाटप, मनोरंजन इत्यादी उपक्रम राबविले जातात. यामध्ये आता पेट्रोल पंपाची भर पडली आहे.
सदर पेट्रोल पंपाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, हिंदुस्तान पेट्रोलियम सोलापूर विभागाचे सत्यनारायण चप्पा, शहर पोलिस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सिद्धेश्वर भोरे, विकास तोटावार, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, वजिराबादचे जगदीश भंडरवार, विमानतळचे अनिरुद्ध काकडे, भाग्यनगरचे अभिमन्यू साळुंके, नांदेड ग्रामिणचे अशोक घोरबांड, इतवाराचे साहेबराव नरवाडे, राखीव पोलिस निरीक्षक शहादेव पोकळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. देवकते, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे यांच्यासह पोलिस कल्याणचे शिवप्रकाश मुळे, बालाजी डुबलवार, सुनील पाटील संतोष सोनसळे, सुषमा इबितवार, शोभिता सोनी आदींची उपस्थिती होती.