राजेंद्र पाटील राऊत
“नको अंत पाहु…आता देवराया! बा…विठ्ठला आता तरी पाव”
पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा..!
(राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
आधीच कोरोना महामारीसारख्या भयंकर रोगराईने त्रस्त झालेला शेतकरी वर्ग आता निसर्गाच्या अवकृपेमुळे उदासीन होऊन उदीग्न अवस्थेत आलेला दिवस कसा तरी निसर्गराजाची प्रतिक्षा करीत बसला आहे.संपूर्ण जुन महिना लोटला गेल्यानंतरही आणि आता जुलैचा आठवडा सुरु होऊनही पुरता आठवडा लोटला गेला तरी पावसाचा कुठेच थांगपता नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला आहे.
दरवर्षी वेळेवर येणारा पाऊस या वर्षी जुन जुलै उलटूनही वेळेवर न बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता नैराश्याच्या गर्तत अडकल्या आहेत.निसर्ग चक्राचा लहरी पणा आणि पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी आता मोठ्या अपेक्षेने आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.दरवर्षी पंढरीकडे जाणारी वारकरीची वारी देखील अगदी रुक्ष वाळवंटातून पायी यात्रा करीत आहेत की काय?असा भास आता होऊ लागला आहे,कुठेच शंभर टक्के पेरण्या झालेल्या नाहीत.त्यामुळे शेतात कोंबच फुटला नाही तर हिरवळ तरी कुठून दिसणार?ज्या भागात शेतकऱ्यानी थोडया फार असलेल्या पाण्याच्या भरोश्यावर पेरण्या केल्या,त्या देखील पाऊस नसल्याने वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात असून,शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.तर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या पीक पेरणीच्या वेळी सहारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकारी तत्वावरील बँकानी आडमुठे धोरण अंगिकारल्याने आणि राजकारणी मात्र आपल्याच राजकीय कुरघोडया करण्यात व्यस्त असल्यामुळे शेतकरी वर्ग पुर्ण मेटाकूटीस आलेला आहे.एकंदरीतच सध्याचे चित्र म्हणजे “राजाने मारले,अन पावसाने झोडपले”तर दाद मागायची कुणाकडे?असाच यक्ष प्रश्न बळीराजापुढे आ वासून उभा आहे.