राजेंद्र पाटील राऊत
नोबेल पारितोषिक विजेते मा.कैलाश सत्यार्थी यांचेकडून जिल्हाधिकारी रमेश घोलप यांचे अभिनंदन
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
झारखंड राज्यातील कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महाराष्ट्राचे सुपुत्र रमेश घोलप यांनी नुकत्याच बालमजुरीतून मुक्त झालेल्या तीन मुलं आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना एक लाख नऊ हजार रुपयाच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.यावेळी त्या मुलांना गणवेश,शाळेची दप्तरे,पुस्तके,लंच बॉक्स इत्यादी साहित्य देण्यात आले.जवळजवळ अर्धा तास पालक आणि मुलांचे समुपदेशन केले.त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना ‘शिक्षणाचा दिवाच तुमच्या दारिद्र्याचा अंधार दूर करू शकतो’,असे पटवून सांगितले.पालकांनीही आपल्या मुलांना भविष्यात बालमजुरीस पाठवणार नाही असे वचन देऊन त्यांच्या उज्वल भविष्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहण्याचे आश्वासन दिले.मुलांना शाळांमध्ये शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्याच्या सूचना तात्काळ शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून लवकरच बालमजुरीचे समुळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी प्रशासन एनजीओसमवेत एकत्रित मोहीम राबविणार असल्याचेही त्यांनी यावेळी घोषीत केले.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही गोष्ट सर्वत्र पसरताच नोबेल पारितोषिक विजेते मा. कैलाश सत्यार्थी,झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, परिवहनमंत्री चंपाई सोरेन यांचेसह अनेक नामांकित व्यक्तिंनी रिट्विट करुन रमेश घोलप यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
कैलाश सत्यार्थी यांनी रमेश घोलप यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, “आपल्या या कौतुकास्पद कार्याबद्दल आपले अभिनंदन!लहान मुलांवर होणारे अन्याय आणि शोषण यांच्या विरोधातील तुमच्या प्रयत्नांना मी आणि माझी संघटना पूर्ण सहकार्य करेल.”
कैलाश सत्यार्थी हे एक भारतीय बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील ‘नोबेल शांतता पारितोषिक’ विजेते आहेत.१९९० सालापासून बालमजूरी उच्चाटनाचे काम करणाऱ्या सत्यार्थींच्या ‘बचपन बचाओ आंदोलन’ ह्या संस्थेने आजवर सुमारे ८०,००० मुलांची सक्तमजूरीमधून मुक्तता केली आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलाश सत्यार्थी यांचे बाल हक्क, बाल संरक्षण चळवळीत प्रचंड मोठे योगदान आहे.
झारखंड राज्यातील कॅबिनेट मंत्री चंपई सोरेन यांनी जिल्हाधिकारी घोलप यांचे कौतुक करताना म्हटले आहे की, “या कृतीबद्दल जिल्हाधिकारी रमेश घोलप आणि जिल्हा प्रशासनाला धन्यवाद. माझे ही हे मत आहे की शिक्षणानेच या मुलांचे आणि त्यांच्या परिवाराचे भविष्य बदलू शकते.”
लहानपणापासून स्वतः गरीबीच्या झळा व दारिद्रयाचे चटके सहन करणाऱ्या घोलप यांनी गेल्या 6-7 वर्षाच्या प्रशासकीय सेवेमध्ये 40 पेक्षा जास्त अनाथ,गरीब,वंचित व शोषीत घटकांच्या मुलांना गॅरेज, हॉटेल्स आदीतून बाल कामगार मधून मुक्त करत त्यांना शाळेत दाखल केले आहे. शैक्षणिक व सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील अधिकारी म्हणून सामाजिक जाणीव ठेवत त्यांच्या पालकांचे समुपदेशन ते करत असतात. काही अनाथ मुलांना शाळेत दाखल करत असताना पालक म्हणून स्वतः चे नाव लिहून ते अशा मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देत असतात.
काही दिवसांपूर्वीच ‘द बेटर इंडिया’ या देशातील प्रसिद्ध वेबसाईटनेही त्यांच्या लहान मुलांना बाल कामगार मधून मुक्त करत शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या या कार्याची दखल घेऊन सन २०२० या वर्षातील भारतातील अशा दहा आयएएस अधिकाऱ्यांमध्ये त्यांची निवड केली होती ज्यांनी आपले रुटीन कार्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या क्षेत्रात असे कार्य केले ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली. झारखंड राज्यात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या या मराठी अधिकाऱ्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.