• Home
  • नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड सरकारी यंत्रणा हादरली!

नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड सरकारी यंत्रणा हादरली!

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210306-WA0020.jpg

नाशिकमध्ये मोठा घोटाळा उघड सरकारी यंत्रणा हादरली!
प्रतिनिधी =किरण अहिरराव

नाशिक, ६ मार्च : नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प घोटाळ्यानं (Nashik stamp scam) डोकं वर काढलं आहे. बहुचर्चित तेलगी स्टॅम्प घोटाळ्यानंतर या नव्या घटनेनं पुन्हा एकदा नाशिक चर्चेत आलं आहे. सध्या तरी देवळा तालुक्यातील कोट्यधीश झालेला एक स्टॅम्प वेंडर जाळ्यात सापडला असला तरी या मुद्रांक घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याची माहिती समोर येत आहे.

भास्कर निकम ही व्यक्ती त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदणी करायला ते गेले आणि एक धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्यांची जमीन ही परस्पर विकली गेल्याचा तो होता पुरावा. चक्क एकाच क्रमांकाच्या 2 स्टॅम्पवर झालेली ही विक्री तिथेच यात काळंबेरं असल्याचं लक्ष्यात आलं.

भास्कर निकम यांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान, संशयित स्टॅम्प वेंडर पसार झाला. स्टॅम्प वेंडर आणि दुय्यम निबंधक कार्यालय, फेरफार नोंद करणारं तलाठी कार्यालय…या ठिकाणी नियमित वावर असलेल्या वेंडरनं केलेला हा प्रताप आता चव्हाट्यावर आला आहे. अनेक वर्ष कोणताही व्यवहार, नोंद नसलेली जमीन माहिती हा वेंडर तलाठी कार्यालयातून मिळवायचा. बनावट शिक्के आणि बनावट स्टॅम्पचा वापर करून चक्क खोटे खरेदीखत तयार करायचा आणि त्याची झेरॉक्स प्रत देऊन नोंदणीही करून घ्यायचा.

काही दिवसानंतर याच जमिनीचा उतारा घेऊन,दुय्यम निबंधक कार्यालयात याच जमिनीची विक्रीही करायचा. यातूनच एकाच जमिनीचे 2 कागदपत्र तयार व्हायचे. अखेर याची तपासणी तहसीलदारांनी केली आणि पोलीस तपास गतिमान झाला. मुद्रांक महासंचालकांनी याची दखल घेत तत्काळ कागदपत्रे घेऊन मुद्रांक कर्मचाऱ्यांना पुण्यात बोलावलं.

रस्त्यात नारायणगावात नाश्त्यासाठी थांबलेल्या या कर्मचाऱ्यांच्या गाडीची काच फोडून चक्क कागदपत्रांची चोरी झाली आणि यातील संशय अधिक बळकट झाला. तातडीनं मुद्रांक महासंचालकांचं विशेष पथक नाशकात दाखल झालं आणि दुय्यम निबंधकांना निलंबित केलं. याच प्रकरणात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात, अशी माहिती आहे. मात्र,जोपर्यंत खरे सूत्रधार म्हणून नाव येत असलेला संशयीत वेंडर वाघ बंधू पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या घोटाळ्याची खरी व्याप्ती स्पष्ट होणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील देवळा येथे मुद्रांक घोटाळा समोर आला आणि आपल्या दस्तावेजांची शहनिशा करण्यासाठी धास्तावलेल्या नागरिकांनी मुद्रांक कार्यालयात धाव घेतली. फरार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत वाघ याच्याकडून दस्तऐवज नोंदणी केलेले नागरिक सध्या मात्र चांगलेच चिंतेत आहे. दरम्यान नोंदणी आणि मुद्रांक विभाग यासह महसूल विभागानं 12 पथकांमार्फत जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या 40 हजार दस्तांची नव्यानं तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरत्या वर्षात लॉकडाऊनमुळं खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. शासनानं स्थावर मिळकत अभिहस्तांतरण किंवा विक्रीकरार पत्राच्या दस्तऐवजावर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात 50 टक्के सवलत देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. 4 महिन्यांसाठी असलेल्या या सवलतींचा फायदा होणार असल्यानं जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना चांगलीच चालना मिळाली. याचाच फायदा हा नोंदणीकृत स्टॅम्प वेंडर्सनं घेतला का? असा तपास आता सुरू झाला आहे.

भास्कर निकम यांची झालेली फसवणूक समोर आली. सध्या तरी हा एकच गुन्हा दाखल असला तरी या तपासणीत अजून काय समोर येतं याची धास्ती अनेकांना आहे. देवळा कार्यालयातील कर्मचाऱ्याला कागदपत्रे संशयास्पद चोरी प्रकरणी निलंबित केलं असलं तर फरार वेंडर चंद्रकांत वाघ पोलिसांच्या हाती लागत नाही तोपर्यंत याप्रकरणातील सर्व धागेदोरे हाती लागणार नाहीत, असं बोललं जात आहे.

anews Banner

Leave A Comment