Home पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रावारसदाराला अखेरचा मुजरा …तील नामवंत काळू बाळूंच्या तमाशा मंडळाच्या 

महाराष्ट्रावारसदाराला अखेरचा मुजरा …तील नामवंत काळू बाळूंच्या तमाशा मंडळाच्या 

125
0

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्रावारसदाराला अखेरचा मुजरा …तील नामवंत काळू बाळूंच्या तमाशा मंडळाच्या
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

कवलापूर (तालुका मिरज जिल्हा सांगली ) महाराष्ट्रातील सारी लोककला आणि लोककलाकारांच्या आस्तित्वाचा सवाल उभा राहिला असताना, नव्या करमणुकीच्या नव्या वाटांनी तमाशासारखी लोककला नेस्तनाबुत व्हायची वेळ आली असताना काळू बाळू तमाशा मंडळासारख्या नामांकित फडाच्या व्यवस्थापकाचं अचानक निघून जाणं फक्त त्या फडासाठी नाही तर सार्‍या लोककलाविश्वासाठी खुप हानीकारक आहे. तमाशा सम्राट काळू बाळू यांचे पुतणे, काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचे संचालक, मालक आणि लोककलाकार संपतराव शामराव खाडे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी निधन झालं. काळू बाळू यांच्यानंतर या फडाला अनेक संकटातून सावरत पुन्हा जोमानं उभं करणारा एक जिगरबाज व्यवस्थापक गेलाच, पण एक हरहुन्नरी लोककलावंतसुध्दा हरपला.
पिढ्यान पिढ्या राजकीय घराणेशाहीची चर्चा चघळत बसणार्‍या याच महाराष्ट्राच्या मातीत लोककलेसाठीही पिढ्यान पिढ्या निष्ठेनं काम करणारी काही घराणी आहेत. संकटं आली, अपमान झाले, समाजानं, शासनानं झिडकारलं, घरदार रस्त्यावर यायची वेळ आली पण या माणसांनी घेतला वसा टाकला नाही. तीन तीन पिढ्या लोककलेत घालवून आम्हाला काय मिळालं असा सवाल त्यांनी कधी केला नाही. पण समाजातील अन्यायावर मात्र हे लोककलावंत व्यवस्थेला जाब विचारत राहिले. आपलं सामाजिक योगदान देत राहिले. काळू बाळू हे नाव याच परंपरेतलं आहे. हीच परंपरा संपतरावांनी जपली. ती जपताना तमाशा जगला पाहिजे यासाठी ते सवाल करत राहिले. लढा देत राहिले.
मराठी मातीतल्या काळू बाळू या घरंदाज घराण्याच्या तब्बल पाच पिढ्यांनी आपला तमाशा जपला, आपली कला जपली. काळू बाळू लोककलेच्या इतिहासातलं एक सोन्याचं पान आहेच, पण इतिहास कितीही सोन्याचा असला तरी वर्तमानकाळ कुणासाठी थांबत नाही. जग जिंकलेली ही जोडी गेली तेव्हा त्यांच्या वारसदारांसमोर आस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. या परिस्थितीत संपतरावांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
आम्ही तुर्रेवाले याचा त्यांना अभिमान होता. महाराष्ट्रात आम्ही एकटेच तुर्रेेवाले. तमाशात कलगीतुर्‍यात गड्यांची बाजू घेऊन भांडतो तो तुर्रेवाला. आम्ही खानदारी तमासगीर. जहरी प्याला, रक्तात नहाली आबरु, संसाराचा झाला तमाशा, वेडा झालो मी तुझ्यासाठी या वगांची रसिक मायबाप आजही आवडीनं शिफारस करतात, अशा आठवणीत ते रमत होते.
पण आजकाल सगळं बदललंय. करमणुकीच्या नव्या तंत्रांनी तमाशाचं कंबरडं पार मोडून टाकलंय. शासनानं काही तरी करायला पाहिजे, असंही ते नेहमी सांगत होते. शासन ऐकत नाही म्हंटल्यावर स्वत:च धडपडत होते. संपतरावांच्या नेतृत्वाखाली काळूबाळूच्या वारसदारांनी नव्या दमानं पुन्हा सुरवात केली. संकटावर मात करत आपली पार्टी जागती ठेवली.
संपतरावांना एकुणच तमाशा कलेची काळजी होती. ते म्हणत, काळू बाळू गेले आणि त्यांचे त्यावेळचे सारे सोबती कलाकारही गेले. बरेच म्हातारे होऊन वारले. मग आम्ही पुन्हा नव्या कलाकारांची नवी फळी तयार केली. पुणे, कराड, नाशिक भागातले कलाकार गोळा केले. आज या फडात 95 कलाकार काम करत आहेत. त्यांच्यासाठी पाच गाड्या आणि पाच मॅनेंजर आहेत. पैशाचं गणित बसत नाही पण घेतला वसा टाकता पण येत नाही, अशी खंत ते व्यक्त करत होते.
माणसं बदलली, त्यांची वागणूक बदलली. पण लोककलाकारांनी जपलेली माणूसकीची नाळ मात्र कधीही संपली नाही. सातु हिरू या पहिल्या पिढीनं सुरु केलेला हा तमाशा काळू बाळूची तिसरी पिढी आणि त्यानंतर आता फडात उभी राहणारी ही नव्या दमाची पाचवी पिढी. संपतराव खाडे या इतिहासाचे साक्षीदार होते. तमाशासम्राट काळू बाळू यांच्यासोबत आणि त्यांच्या नंतरही संपतराव यांनी या फडाची धुरा सांभाळली. हरहुन्नरी कलाकार म्हणून त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासूनच ते अखेरपर्यंत आपली कला दाखवत रसिकांना चकीत केले होते. या फडाच्या वाटचालीत त्यांचं खुप मोठं योगदान होतं. काळूबाळू यांच्यानंतर त्यांनीच या फडाच्या व्यवस्थापनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती यशस्वी करुन दाखवली. अखेरपर्यंत त्यांनी ही जबाबदारी हिमतीने पार पाडली. या लोककलावंताला मानाचा मुजरा!

Previous articleकामात केलेली हलगर्जी भोवली, चार शिक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे दिले गेले आदेश..
Next articleजिल्ह्यात 4 जानेवारीपासून शाळा सुरू होणार;* *कोविड लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज* *: पालकमंत्री छगन भुजबळ*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here