राजेंद्र पाटील राऊत
*आदिवासींसाठी खावटी अनुदान योजना*
(बाळासाहेब निकम/आनंद नागमोती युवा मराठा न्युज नेटवर्क)
कळवण : कळवण प्रकल्पातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांसाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात आल्याची माहिती कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पाश्वभुमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना कळवण प्रकल्पात राबविली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबीयांना चार हजार रुपये लाभ मिळणार असून पन्नास टक्के रोख व पन्नास टक्के वस्तु स्वरूपात वितरित केला जाणार आहे. लाभार्थ्यांमध्ये ता. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत मनरेगावर कार्यरत असणारे आदिवासी मजूर, आदिम, पारधी जमातीचे सर्व कुटुंब, शासनाने निश्चित केलेले गरजू आदिवासी कुटुंब ज्यामध्ये परित्यक्त्या, घटस्फोटित महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, अपंग व्यक्ती असलेली कुटुंबे व अनाथ मुलांचे संगोपन करणारी कुटुंबे यांचा समावेश आहे.
लाभार्थ्यांनी आधारकार्ड, जातीचा दाखला, रेशनकार्ड, बँक पासबुक इत्यादि कागदपत्रासह नजीकच्या आश्रमशाळेत ता. ५ डिसेंबर पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कळवण प्रकल्प कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.