……संपादकीय अग्रलेख!
कही दीप जले,कही दिल
खरी दिवाळी कुणाची?*
*वाचकहो,*
दरवर्षीच येते दिवाळी.मात्र यावर्षीची दिवाळी हि अत्यंत शुकशुकाटात व कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या धास्तीत एक परपंरा म्हणून साजरी होत आहे.दिवाळीचे चार दिवस म्हणजे उत्साहाचे,आनंदाची पर्वणी साजरी करुन अंधकारावर मात करुन प्रकाशमय तेजाच्या प्रकाशात सगळ्यांचे जीवन उजळून निघावे हाच संदेश देणारा हा दिवाळी पर्वाचा सण!
मात्र सध्या खरे अर्थाने दिवाळी कुणाची?असेच म्हटले गेले, तर दिवाळी हि भामटयांची,काळाबाजार करणाऱ्या हरामीची..टाळूवरचे लोणी खाऊन हपापाचा माल गपापा जमविणा-या बांडगुळाची हि दिवाळी.कोरोना काळात अनेकांना रोजगार नसताना स्वार्थापोटी लुबाडणा-या भामटया हडवाळीची हि दिवाळी.आजही ग्रामीण भागात अनेकांची यंदा दिवाळीच साजरी होणार नसल्याचे विदारक सत्य चित्र उभे ठाकले आहे.कोरोनाने हिरावून घेतलेला रोजगार…अन दिवाळी सणाच्या तोंडावर वाढलेली अव्वाच्या सव्वा महागाईने सर्वसामन्यांचे अक्षरशः कंबरडेच मोडून काढले आहे.मग खरी दिवाळी कोणाची? हा पुन्हा प्रश्न उपस्थित करावा लागत आहे.ज्यांनी हरामाची अमाप कमाई करुन ठेवली ते भ्रष्टाचारी तर रोजच दिवाळी साजरी करीत आहेत.मात्र एकवेळच्या अन्नाला पारखे झालेले आमचेच मायबाप,भाऊ बहिण निदान या सणात तरी उपाशी राहणार नाहीत याची काळजी जरी प्रत्येकाने घेतली तरी दिवाळी सण साजरा केल्याचे समाधान सार्थकी लागेल!नाही तर नाईलाजास्तव म्हणावेच लागेल,कही दीप जले कही दिल…!दिवाळीचे चार दिवस म्हणजे गोडधोड बनवून खाण्याची पर्वणी! मात्र यावर्षी शासनाने गोरगरीबांची हि गोड दिवाळी कडू करुन ठेवली आहे.
आज दिवाळीचा दुसरा दिवस,धनतेरस.मात्र अजूनही बहुतांशी रेशन दुकानामध्ये दिवाळी सणासाठी साखरच उपलब्ध करुन दिलेली नाही.अधिकाऱ्यांची उदासिनता यानिमिताने बघावयास मिळत आहे.एका बाजूला कोरोनाने घातलेले थैमानाचे वैषम्य बाजूला ठेऊन सर्वसामान्य दिवाळीचे स्वागत करायला उत्साहित झालेला असतानाच,शासनाने गोरगरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी अजूनही साखरच उपलब्ध करुन न दिल्यामुळे ,मग खरी दिवाळी कुणाची?हा प्रश्न शेवटी उरतोच!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक