• Home
  • 🛑 अकरावी प्रवेशप्रकियेचा मनस्ताप मुख्याध्यापकांना 🛑

🛑 अकरावी प्रवेशप्रकियेचा मनस्ताप मुख्याध्यापकांना 🛑

🛑 अकरावी प्रवेशप्रकियेचा मनस्ताप मुख्याध्यापकांना 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 9 ऑगस्ट : ⭕ अकरावी प्रवेशप्रक्रियेत पैसे भरतानाचा गोंधळ जेमतेम सुटतोय तोच शाळांतील मुख्याध्यापकांनी या प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज भरला की नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवली आहे. मात्र त्यासाठी आवश्यक सुविधा न दिल्याने मुख्याध्यापक नाराज असून आता प्रत्येक विद्यार्थ्यांना फोन करून तपशील घ्यावा लागत आहे.

अकरावी प्रवेशप्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे. मात्र यात अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी प्रवेशअर्ज भरले का, याकडे लक्ष ठेवण्याबाबत सूचना येत आहेत. दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बोलवून अर्ज भरून घेतले जातात. यामुळे नेमके किती विद्यार्थ्यांनी अर्ज भरले याचा तपशील मुख्याध्यापकांकडे असतो. मात्र यंदा शाळेत बोलवून अर्ज भरून घेणे शक्य नसल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दिला आहे. यात केवळ ज्या विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र आहे व ते शाळेतून साक्षांकित करून घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांनीच अर्ज भरले आहेत की नाही हे मुख्याध्यापकांना समजते. मात्र इतर विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे की नाही, हे समजत नाही.

मुख्याध्यापकांना रोज शिक्षण विभागाकडून व्हॉट्सअॅपवर आदेश दिले जात आहेत की किती विद्यार्थ्यांनी अर्ज भरले याचा तपशील द्या. यामुळे आता शाळेतील लिपिक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला फोन करून अर्ज भरलास का, नसेल भरला तर तो भरण्याबाबत सूचना करावी लागत आहे. यामुळे मुख्याध्यापकांना एका स्क्रीनवर त्यांच्या शाळेचा तपशील मिळेल, अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटवर मुख्याध्यापकांना शाळेचा यूडायस क्रमांक टाकून लॉग-इन करावे लागते. यामुळे शिक्षण विभागाला त्या यूडायस क्रमांकाच्या किती विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहे याचा तपशील एका क्लिकवर उपलब्ध करून देणे शक्य आहे. यामुळे शिक्षण विभागाने याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी केली आहे. हा डॅशबोर्ड मिळाल्यास नेमके कोणी अर्ज भरले नाही हे हेरणे सोपे होईल आणि त्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेणे शक्य होईल, असे मतही रेडीज यांनी व्यक्त केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment