कोरोना बाधितांची वाढती संख्या रोखण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाची भूमिका घेऊन मिशन मोडवर सर्व सामान्यांमध्ये जनजागृती करावी ; पालकमंत्री राजेश टोपे – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे
जालना,दि. २७ – लोक सहभागा शिवाय कुठलेही काम यशस्वी होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या कमी करण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करत एकजुटीने, समर्पित भावनेने व समन्वयाची भूमिका घेऊन मिशन मोडवर काम करण्याची गरज असुन आयसीएमआर ने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन होऊन कोरोना बाधितांची संख्या कमी होण्यासाठी नागरिकांमध्ये अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सामाजिक अंतराचे पालन करत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड बाधितांमध्ये 85 टक्के रुग्ण हे जालना शहरातील असुन उर्वरित 15 टक्के रुग्ण हे ग्रामीण भागामधील आहेत. जालना जिल्ह्यामध्ये कोव्हीड बाधित रुग्ण बरे होण्याचा दर हा 65.80 टक्के इतका असुन मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये हा अधिक प्रमाणामध्ये असुन मृत्यूदर हा 3.3 एवढा असुन गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यामध्ये कोव्हीड बाधितांना उपचार देण्यासाठी आरोग्याच्या सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याचे सांगत सर्व सोईनीयुक्त अशा 150 खाटांच्या डेडीकेटेड कोव्हीड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असुन या ठिकाणी 50 खाटांचा अतिदक्षता कक्ष आहे. त्याचबरोबर जिल्हा सामान्य रुग्णालयांचे रुपांतर कोव्हीड रुग्णालयात करण्यात आले असुन एकुण 325 खाटा या कोव्हीड बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा या कोव्हीड बाधितांवर उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
जालना जिल्ह्यात बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सीएसआर फंडामधुन 78 व्हेटींलेटर, पीपीई किट, एन-95 मास्क रेमेडीसेव्हीयर यासह इतर आवश्यक औषधी तसेच साधसामग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल तातडीने मिळावा यासाठी अथक प्रयत्नातुन जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशा आरटीपीसीआर लॅबची उभारणीही करण्यात आली असुन जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे सांगत कोरोनाचा वाढता आकडा कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. कोव्हीड आजार हा निश्चित बरा होतो. नागरिकांनी घाबरु नये, शासन, प्रशासनामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, सार्वजनिक गर्दीच्या जाऊ नये व विनाकारण गर्दी करु नये, सामाजिक अंतराचे पालन करण्याबरोबरच मास्कचा वापर करणे यासारख्या बाबींची माहिती सर्वसामान्यांना स्वयंसेवी संस्थानी देण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर अशी माहिती दिली.
यावेळी उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीनींही उपयुक्त अशा सुचना केल्या. बैठकीस जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.