Home Breaking News
110
0

🛑 ऑक्सिजनची वाट बघत ते रुग्णालयातच कोसळले!🛑
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ आधीच बायपास, त्यात करोना झालेल्या आपल्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तब्बल दोन दिवस सहा रुग्णालये पालथी घातली. मात्र कुठेच खाट उपलब्ध झाली नाही. तिसऱ्या दिवशी जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये प्रवेश मिळाला, मात्र तोपर्यंत शरीरातील ऑक्सिजनची पातळी खूपच घसरली होती. रुग्ण अक्षरशः धापा टाकत ऑक्सिजनची मागणी करत रुग्णालयाच्या आवारातच कोसळला. त्यांचा मुलगा नितीश, ‘माझ्या वडिलांना ऑक्सिजन लावा…’, असा आक्रोश करत होता. मात्र त्याचा टाहो कुणीच ऐकला नाही.

खासगी वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या सांताक्रुझ, खार येथील गजधरबांध परिसरात एका चाळीत राहणाऱ्या राजाराम सावंत (नाव बदलले आहे) या ५४ वर्षांच्या व्यक्तीला मागील तीन ते चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. बायपास झाली असल्यामुळे त्रास होत असावा या अंदाजाने नातेवाईक त्यांना जवळच्या होली स्पिरिट या खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र तेथे खाट उपलब्ध नव्हती. श्वासाच्या त्रासामुळे तेथे त्यांची करोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी त्यांचे नातेवाईक २७ ते २९ मे असे दोन दिवस भाभा रुग्णालय, नायर, व्ही. एन. देसाई, रामकृष्ण मिशन आणि खार, सांताक्रुझ परिसरातील अन्य दोन खासगी रुग्णालयांत त्यांना घेऊन फिरले. मात्र कुठेच खाट उपलब्ध झाली नाही.

सावंत यांना श्वास घेण्यास खूपच त्रास होत असल्याने २९ मे रोजी नातेवाईकांनी एक ऑक्सिजन सिलिंडर विकत आणून लावला. त्यानंतर पालिकेशी संपर्क साधून खाट मिळवून देण्याची विनंती केली. पालिकेचे कर्मचारी घरी येऊन रुग्णाला बघून पाच मिनिटांत रुग्णवाहिका पाठवतो म्हणून निघून गेले. ते आणि रुग्णवाहिका दोन्ही आले नाहीत. सावंत यांना श्वास घेण्यास खूपच अडथळे येऊ लागल्याने एका पोलिस अधिकाऱ्याच्या मदतीने एक रुग्णवाहिका मिळाली. मात्र त्यात ऑक्सिजनची व्यवस्था नव्हती. सावंत कुटुंबीयांकडे असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची पीन रुग्णवाहिकेतील विजेच्या स्वीचला लागत नव्हती.

यामध्ये अधिक वेळ जाऊ नये यासाठी सावंत यांना रात्री दहा वाजता विनाऑक्सिजन जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन गेले. तोपर्यंत त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खूपच खाली येऊन ते रुग्णालयाच्या आवारातच कोसळले. मुलगा नितीश याने, ‘माझ्या वडिलांना ऑक्सिजन लावा, त्यांच्यावर लवकर उपचार करा’, अशी विनंती तेथील कर्मचाऱ्यांना केली. मात्र तब्बल एक ते दीड तास डॉक्टर फिरकलेच नाहीत. तोपर्यंत सावंत बेशुद्ध झाले होते. त्यानंतर डॉक्टरने त्यांना आयसीयूमध्ये नेले. तिथे काय उपचार केले याची कोणतीही माहिती नातेवाईकांना न देता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. ‘आम्ही उपचार करतो आहे हे आम्हाला दाखवण्यासाठी वडिलांना आयसीयूत घेऊन गेले. खरेतर त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. वेळेत रुग्णालयात प्रवेश मिळून उपचार झाले असते तर माझे वडील वाचू शकले असते’, असे नितीश यांनी सांगितले.

रुग्णवाहिकेअभावी अंत्यसंस्काराला विलंब

मृतदेह घेण्यासाठी शनिवारी सकाळी दहा वाजता सावंत कुटुंबीयांना रुग्णालयात बोलावण्यात आले. मात्र संध्याकाळपर्यंत रुग्णवाहिकाच मिळाली नाही. रात्री उशिरा रुग्णवाहिका मिळाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

https://aaplekayde.blogspot.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here