• Home
  • अमरावती आणि अकोला येथे कोरोनाचा उद्रेक !

अमरावती आणि अकोला येथे कोरोनाचा उद्रेक !

⭕ अमरावती आणि अकोला येथे कोरोनाचा उद्रेक ! ⭕
( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

सरकारने करोना रुग्णांसाठी नवीन उपचार केंद्रे तयार करण्याचा निर्णय घेतला खरा, पण आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ, वैद्यकीय सामग्रीची कमतरता, विविध सरकारी यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव एकीकडे जाणवत असताना लाल क्षेत्रात समावेश असलेल्या अमरावती आणि अकोला शहरांतील करोनाचा उद्रेक रोखायचा कसा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अमरावती आणि अकोला या दोन शहरांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या चारशेच्या वर पोहचली आहे. एकीकडे, आरोग्य यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळातही करोनाशी दोन हात करताना दिसत आहे. दुसरीकडे, इतर सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना कुठलेही काम सोपविण्यात आलेले नाही.
प्रशासकीय पातळीवरील हलगर्जीपणा आणि लोकांमधील बेफिकिरी यानिमित्ताने समोर आली आहे.

आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवर सर्वाधिक ताण जाणवत असताना अजूनही इतर विभागांची सेवा घेण्यासाठी नियोजन करण्यात आलेले नाही. परिणामी अनेक भागात संचारबंदीचे पालन काटेकोरपणे होऊ शकत नाही, हे सार्वत्रिक चित्र आहे. करोनाची तीव्रता स्पष्ट करण्यासाठी महापालिकांनी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले. अमरावतीत या प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २८, तर अकोल्यात तब्बल ५१ वर पोहचली आहे. अध्रे अकोला शहर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गेल्याने आणि त्यात नवनवीन वस्त्यांची भर पडत असल्याने चिंता वाढली आहे.

अकोल्यातील एकटय़ा बैदपुरा भागात सर्वाधिक ४७ करोनाबाधित आढळून आले आहेत. हीच स्थिती अमरावतीची आहे. सुरुवातीला पूर्वेकडील पाच ते सहा वस्त्यांपर्यंत सीमित असलेला करोनाचा संसर्ग आता पूर्वेकडील वस्त्यांमध्येही पोहचला आहे. हा समूह संसर्ग नसल्याचा दावा प्रशासन सातत्याने करीत असताना एकाच वस्तीमध्ये मोठय़ा संख्येने करोनाग्रस्त रुग्ण आढळून येणे आणि दोन ते तीन आठवडय़ांपर्यंत त्या भागातील फैलाव आटोक्यात न येणे, यातून प्रशासकीय स्तरावरील मर्यादा उघड झाल्या आहेत.

दोन्ही शहरांमधील महापालिकांनी सर्वेक्षण करून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेतला असला, तरी हे प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षणादरम्यान यंत्रणेला अत्यंत धोकादायक स्थितीत काम करावे लागत आहे.

anews Banner

Leave A Comment