आशाताई बच्छाव
मेघना कावली नांदेडच्या नव्या सीईओ मिनल करनवाल यांची जळगावला बदली.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्या मिनल करनवाल यांची जागा घेणार आहेत. मिनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे.
नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करनवाल आता जळगाव येथे मुख्य कार्यकारी पदी रुजू होणार आहेत. गेल्या अडीच वर्षात मिनल करनवाल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण, आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी विविध योजना राबविल्या आहेत. बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला. त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले. नुकतीच त्यांनी बालिका पंचायत 2.0 नव्या टप्प्याची सुरुवात केली होती.
नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या. त्यांनी किनवट सारख्या आदिवासीबहुल भागामध्ये शैक्षणिक सुधारणांवर विशेष भर दिला.आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी केला आहे.