आशाताई बच्छाव
येरगी येथे मातृ – पितृ पूजन दिवस संपन्न.
▪️मुलांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी बालिका पंचायत राजचा अभिनव उपक्रम.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
देगलूर: तालुक्यातील चालुक्य कालीन नगरी येरगी येथे बालिका पंचायत राज समितीच्या वतीने मुलांमध्ये संस्कार रुजविले जावेत यासाठी मातृ – पितृ पूजन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मातृ – पितृ पूजन कार्यक्रमात
गावातील मारोती मंदिर परिसरात आई वडिलांना बसवून त्यांच्या मुला -मुलींना त्यांच्यासमोर बसवण्यात आले . त्यानंतर मुलांकडून त्यांच्या आई वडिलांचे पाय धुवून त्याचे पूजन करून फूल अर्पण करण्यात आले.त्यानंतर प्रत्येक मुला मुलींनी त्यांच्या आई वडिलांची ओवाळणी केली. नंतर आई वडिलांनी आपल्या लेकरांना मिठी मारून त्यांना आशीर्वाद दिले.
यावेळी माता पित्याचे डोळे प्रेम भावनेने पाणावले होते. याचवेळी आईवडिलांचे महात्म्य दर्शवणारे संगीतमय गीत प्रस्तुत करण्यात आले.
सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालिका पंचायत राज समितीच्या वतीने सदरील कार्यक्रम पार पडला.
सरपंच संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावात विभिन्न उपक्रम राबविण्यात येतात. ज्याची दखल महाराष्ट्र पातळीवरच नव्हे तर देश पातळीवर घेतली गेली आहे.
गावाचा विकास साधायचा असेल तर संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे हा उदात्त हेतू लक्षात घेऊन भारतीय परंपरेनुसार वसंत पंचमी ,रक्षाबंधन,रंगपंचमी,सहस्र दिप प्रज्वलन असे विभिन्न कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
येरगीच्या इतिहासात पहिल्यांदाच मातृ – पितृ पूजन कार्यक्रम साजरा करण्यात आला. आईवडिलांविषयी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणारी पिढी निश्चितच घडेल असा युक्तिवाद गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केला. या कार्यक्रमाची स्तुती तालुक्यात होत आहे.