आशाताई बच्छाव
कोविड काळात पदाचा दुरुपयोग; आठ महिने भाड्याने गाड्या चालवून लाखो रुपयांचा अपहार?
तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप; वाहन मालकांनी केली तक्रार
पालघर, अमोल काळे ब्युरो चीफ: कोविड-१९ च्या काळात भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाड्यांचा वापर संपल्यानंतरही आठ महिने गाड्या चालवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तत्कालीन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत संदीप नरेंद्र आंबले आणि रामदास वामन शिंदे या वाहन मालकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत शासकीय आदेशांचे उल्लंघन आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पालघर तालुक्यात २०२०-२१ मध्ये कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्यानंतर रुग्णांच्या सोयीसाठी काही गाड्या भाड्याने घेण्यात आल्या होत्या. यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीही उपलब्ध करून दिला होता. तत्कालीन तहसीलदार सुनिल शिंदे यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी डॉ. खंदारे यांना पत्र लिहून ३१ मार्च २०२१ पर्यंतच गाड्या वापरण्याची परवानगी दिली होती. शासकीय आदेशानुसार, ३१ मार्चनंतर या गाड्या कार्यमुक्त करणे आवश्यक होते. मात्र, स्थानिक परिसरात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याचे कारण देत डॉ. खंदारे यांनी आपल्या अधिकारात वाहन क्रमांक एम एच ४८ बी एच ९६६९ आणि एम एच ४८ एफ ६६६७ या दोन गाड्या १ एप्रिल २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालवल्या. या आठ महिन्यांचे देयक (गाडी भाडे) अजूनही गाडी मालकांना देण्यात आले नाही यामुळे शासकीय निधीचा दुरुपयोग झाला असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणी वाहन मालक संदीप आंबले आणि रामदास शिंदे यांनी डॉ. खंदारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, आठ महिन्यांचे भाडे वसूल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालिमठ यांच्या पत्रव्यवहाराचाही दाखला तक्रारदारांनी दिला आहे. या पत्रव्यवहारात निधीच्या उपलब्धतेबाबत चर्चा झाली होती, मात्र डॉ. खंदारे यांना गाड्या चालवण्याची विशेष परवानगी दिल्याचे कुठेही नमूद नाही.
आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डॉ. खंदारे यांच्यावर कारवाई होणार का, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.