आशाताई बच्छाव
माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास. या प्रवासात कित्येक माणसं येतात, काही सोबत राहतात, काही वाटेतच सोडून जातात. कोणी प्रेम देऊन जातं, तर कोणी फसवून. कोणी आपलं म्हणतं, तर कोणी विश्वासघात करतं. पण आपण काय करतो? त्या फसवणुकीचा, त्या वाईट आठवणींचा बोजा उराशी घट्ट धरून ठेवतो.
सतत विचार करत राहतो— “तो असं का वागला?”, “तिने माझ्यासोबत असं का केलं?”, “मी काय चुकलो?”
पण यातून आपण काय मिळवतो? फक्त त्रास, दुःख आणि मनस्ताप.
प्रत्येक नातं टिकतंच असं नाही…
लोक येतात आणि जातात. काही कायमचे राहतात, काही तात्पुरतेच असतात. पण आपण मात्र लोकांनी सोडून गेल्याचं, त्यांनी दिलेल्या वेदनांचं ओझं उगाचच उचलत बसतो.
❌ मित्राने पाठ फिरवली? – हरकत नाही, त्याला नवीन मित्र सापडले असतील.
❌ एखाद्याने फसवलं? – हरकत नाही, त्याच्या स्वभावाचं प्रतिबिंब आहे ते.
❌ कोणी नात्यात विश्वासघात केला? – हरकत नाही, त्यांनी स्वतःला गमावलं.
समाज आपल्याला शिकवत राहतो की, “लोकांनी तुमच्यावर अन्याय केला तर ते विसरू नका.”
पण खरं सुख ह्यात आहे की, त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढे चालायला शिका.
स्वतःला सुधारायला विसरू नका
लोकांच्या चुकीकडे बोट दाखवणं सोपं आहे, पण आपण कुठे चुकलो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेदना ही शिकवण असते. प्रत्येक धोका ही एक शिकवणूक असते. म्हणूनच,
✔️ स्वतःला प्रश्न विचारा – मी कुठे चुकलो?
✔️ मी लोकांवर अती विश्वास तर ठेवत नाही ना?
✔️ मी स्वतःला गृहित धरून घेत नाही ना?
✔️ मी योग्य लोकांना माझ्या आयुष्यात स्थान देतोय का?
ही उत्तरं शोधली, की तुम्ही स्वतःच्या चुकांमधून शिकाल आणि भविष्य अजून सुंदर बनवाल.
पुढे जायचं तर जुनं मागे टाकावं लागेल
कोण कसं वागलं ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा, पुढे कसं वागायचं, कसं सुधारायचं ह्यावर लक्ष द्या.
“लोकांचे मुखवटे पाहून रडण्यात वेळ घालवू नका, तुमचं खरं हास्य कोणासाठी राखायचं हे ठरवा.”
आणि शेवटी, ज्यांना जावं वाटतं, त्यांना जाऊ द्या.
स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा. कारण तुमची खरी किंमत समजणारेच तुमच्या आयुष्यात खऱ्या जागेचे हक्कदार असतात.
✍🏿 स्वप्निल बापू देशमुख( पत्रकार)
राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ