आशाताई बच्छाव
प्रत्येक प्रांताची वेगळी बोलीभाषा असते
: सुनील गोसावी
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी ..दिपक कदम
प्रत्येक प्रांताची वेगळी बोलीभाषा असते, लहजा वेगळा असतो आणि म्हणून आपल्याला ती आवडत असते. मराठी भाषेचे सौंदर्य अधिक फुलत असते. शिला लेखाच्या माध्यमातून आणि ताम्रपटाच्या माध्यमातून मराठी ही अति प्राचीन भाषा असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे असे प्रतिपादन शब्दगंध चे संस्थापक व लेखक, कवी, साहित्यिक सुनील गोसावी यांनी केले आहे.
देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये शब्दगंध चे संस्थापक व लेखक,कवी, साहित्यिक सुनील गोसावी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी विकास नवाळे हे होते. यावेळी ग्रंथपाल संभाजी वाळके, कार्यालयीन अधिक्षक तुषार सुपेकर, भूषण झारकर, दिनकर पवार,अभिषेक सुतावणे, भूषण नवाल,निखिल नवले, गोपाल भोर, कृष्ण महांकाळ,स्वप्निल फड, अमोल कांबळे अरुण कदम,अशोक जाधव,पत्रकार राजेंद्र उंडे,अशोक शिंदे, अशोक झावरे, सविता हारदे, अश्विनी भांगरे,योगेश सरोदे,बाळासाहेब भोंडवे आदी उपस्थित होते.
यावेळी व्याख्यानातून गोसावी यांनी सांगितले की,आपली मराठी भाषा महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर बारा कोसावर बदलते, बोलीभाषा आणि लिखित भाषा अशा दोन प्रकारात मराठी भाषेचा विकास झालेला आहे, प्रत्येक प्रांताची वेगळी बोलीभाषा असते, लहजा वेगळा असतो आणि म्हणून आपल्याला ती आवडत असते. मराठी भाषेचे सौंदर्य अधिक फुलत असते. शिला लेखाच्या माध्यमातून आणि ताम्रपटाच्या माध्यमातून मराठी ही अति प्राचीन भाषा असल्याचे समोर आलेले आहे, त्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, आज इंग्रजी मिश्रित मराठी सर्व कुटुंबांमध्ये बोलली जाते, मराठीचा वापर जास्तीत जास्त होत असल्याने हा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे. मातृभाषा चा वापर आपण सर्वांनी केला पाहिजे.असे सुनील गोसावी यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना मुख्याधिकारी विकास नवाळे म्हणाले की,इंग्रजी ही ज्ञानभाषा असून मराठी ही मातृभाषा आहे, मातृभाषेचा विकास होण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहे ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे.भाषेचा अडसर कोणत्याही ठिकाणी येत नसतो, आपले कार्य कर्तृत्व दाखवण्यासाठी आपली बोलीभाषा आपल्याला महत्त्वाच्या टप्प्यावर घेऊन जात असते, म्हणूनच इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषा ही सर्वांना आली पाहिजे.असे मुख्याधिकारी नवाळे यांनी सांगितले.
श्री त्रिंबकराज वाचनालयाच्या वतीने उत्कृष्ट वाचक म्हणून पत्रकार राजेंद्र उंडे, अशोक शिंदे व आशोक झावरे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री. त्रिंबकराज सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी केले तर आभार प्रदर्शन लेखापाल स्वप्निल फड यांनी केले.