आशाताई बच्छाव
देवळा वाखारी रोडवर अपघातात तरुण ठार
देवळा, भिला आहेर तालुका प्रतिनिधी: देवळा वाखारी रोडवर करला नाल्यालगत झालेल्या स्कूल बस व मोटरसायकल अपघातात वाखारी येथील २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकावर देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक १७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाखारी ते देवळा रोडवर करले नाल्याच्या जवळ होंडा शाईन सिल्वर मोटरसायकल क्रमांक एम एच 41 बी क्यू 3984 यावर वाखारी, ता. देवळा येथील मनोज दिलीप जगदाळे वय २४ हा जात असताना विरुद्ध बाजूने येणारी बस क्रमांक एम एच 08 ए पी 4148 यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मनोज याच्या वर्मी घाव लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. सदर अपघाताची माहिती देवळा पोलिसात दिली असता पोलीस नाईक ज्योती गोसावी व पोलीस हवालदार भास्कर सोनवणे यांनी तत्काळ अपघात स्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी भारत चिमण जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बस चालक समाधान धुळाजी व्हरकटे, रा. चांदवड यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोसावी व सोनवणे करीत आहेत. फोटो : मयत मनोज जगदाळे व अपघातग्रस्त मोटरसायकल.