आशाताई बच्छाव
मोताळात गुटख्याची गाडी पकडली
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा:- मोताळा, ता. १० राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारे वाहन बोराखेडी पोलिसांनी पकडले. आज (ता. १०) सकाळी येथील आठवडी बाजार परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी अंदाजे ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे.
नांदूऱ्याकडून मोताळ्याकडे एका वाहनात गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी आज (ता. १०) सकाळी नांदुरा ते मोताळा मार्गावरील आठवडी
बाजार परिसरात सापळा रचून एम. एच. २८ बी.बी. ७४९१ क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाला पकडले. त्याची तपासणी केली असता, त्यात राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला ५८ पोते सुगंधित गुटखा मिळून आला. पोलिसांनी अंदाजे २५ लाखांचा गुटखा व १० लाखांचे वाहन असा एकूण ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, आज सकाळी झालेल्या या कारवाईची रात्री आठ वाजेपर्यंतही प्रसार माध्यमांना पोलिसांकडून माहिती मिळू शकली नाही. या संदर्भात बोराखेडी पोलिसांशी संपर्क साधला असता, कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.