आशाताई बच्छाव
महाराणा प्रतापसिंह चौकाचे सौदर्यीकरण करुन पुतळा बसवा
सकल राजपुत व हिंदु समाजाची मागणी : न.प. मुख्याधिकार्यांना निवेदन
वाशिम,( गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- शहरातील श्री महाराणा प्रतापसिंह चौकाचे सौदर्यीकरण करुन समस्त हिंदु व राजपुत समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या हिंदुसुर्य विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा बसविण्याची मागणी सकल राजपुत व हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सर्व समाजबांधवांच्या वतीने मंगळवार, ९ जुलै रोजी नगर परिषद मुख्याधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, शहरात प्रत्येक चौकाचे सौंदर्याकरण करण्यात आले आहे व प्रत्येक महापुरूषांचे पुतळे सुध्दा उभारण्यात आलेले आहे. परंतू हिंदूसूर्य विर शीरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा जाणूनबुजुन शासनाकडून वारंवार अपमान करण्यात येत आहे. श्री महाराणा प्रतापसिंह चौकाचे सौंदर्याकरण करून तिथे त्याच जागेवर भविष्यात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा ही सर्व राजपुत व हिन्दु समाजाची भावना आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा आमीषाला बळी न पडता व जागा बदल न करता त्याच जागेवर आम्हाला सौंदर्याकरण करून पुतळा बसवुन द्यावा. पुतळ्याची जागा बदल केल्यास समस्त राजपूत व हिन्दू समाजाला तिव्र आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही. मागील ४० वर्षापेक्षा जास्त वर्षापासुन समाजबांधव त्याठिकाणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती व पुण्यातिथी साजरी करीत आहेत. त्या ठिकाणी सध्या महाराणा प्रताप यांचे छायाचित्र ओट्यावर लावलेले आहे. त्या चौकात नगर परिषदेकडुन नियमित स्वच्छता सुध्दा केली जात नाही. याकडे नगर परिषदेने जातीने लक्ष घालणे आवश्यक आहे. नियमित स्वच्छता न राखल्यास संबधित कर्मचारी व कंत्राटदार यांच्यावर रितसर कारवाई करण्यात यावी. तसेच चौकाचे सौदर्यीकरण व पुतळा बसविण्याची कार्यवाही करुन समाजाच्या भावनांचा सन्मान करावा अशी मागणी निवेदनात नमुद केली आहे. निवेदनावर अ.भा. क्षत्रिय महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह अजमीरे, राजपूत करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष सावनसिंह चौहान, बहादुरसिंह चौहान, श्रीरामसिंह चौहान, प्रल्हादसिंह चौहान, दयालसिह तोमर, लक्ष्मीनारायणसिंह तोमर, डॉ. शैलेंद्र ठाकुर, डॉ. सागर ठाकुर, बिसनसिंह चंदेल, सज्जनसिंह चंदेल, माजी न.प. अध्यक्ष सुरेश लोध, समाजसेवक राजाभैय्या पवार, युवा उद्योजक मनिष मंत्री, माजी सभापती राहुल तुपसांडे, माजी न.प. उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह ठाकुर, माजी न.प. सदस्य अॅड. विनोद खंडेलवाल आदींसह शेकडो राजपुत व हिंदु समाजबांधवांच्या सह्या आहेत.