आशाताई बच्छाव
धम्माच्या प्रेरणेतून ‘पीपल्स’ एज्युकेशन ची स्थापना– आनंदराज आंबेडकर
संजीव भांबोरे
मुंबई दि. ८
धम्म म्हणजे तथागत गौतम बुद्धांची शिकवण. केळुसकर गुरुजींनी स्व लिखित बुद्ध चरित्र भेट दिल्यानंतर ते वाचून लहानपणापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्माविषयी आवड निर्माण झाली होती असे दिसते. पुढे त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या आधीच म्हणजे ८ जुलै १९४५ रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व १९४६ ला पहिले कॉलेज काढून त्याला ‘सिद्धार्थ’ हे नाव दिले. यावरून आपल्या सहज लक्षात येते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धाच्या शिकवणुकीमुळे लहानपणापासूनच प्रेरित झाले होते. १९३५ ला त्यांनी केवळ धर्मांतराची घोषणा केली असली तरी त्यांचा बौद्ध धम्म स्वीकारण्याचा निर्णय सुद्धा पक्का झाला होता हे त्यांच्या पुढील कृतीवरून आपल्या लक्षात येते. आपल्या सोबत धर्मांतरित झालेल्या बौद्ध कुटुंबातील विद्यार्थी तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे हे प्राथमिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना
केली आहे,” असे उद्गार पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई चे विद्यमान चेअरमन ऑनरेबल आनंदराज आंबेडकर यांनी काढले. ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्थापित ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई’ या संस्थेचा ७९ वर्धापनदिन फोर्ट मुंबई येथील बुद्ध भवनातील, सिद्धार्थ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला अनुसरून पहिल्या प्रथम तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून त्रीसरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे ट्रस्टी जेष्ठ विधिज्ञ ऍड. संघराज रूपवते, सिद्धार्थ लॉ कॉलेज आनंद भवन फोर्ट मुंबई च्या प्राचार्या डॉ. संध्या डोके,सिद्धार्थ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनतकरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय महाड प्राचार्या डॉ. आरती वानखेडे,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज वडाळा मुंबई चे प्राचार्य डॉ.वऱ्हाळे,पीईएस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सीबीडी बेलापूर चे प्राचार्य बी. बी. पवार यांची भाषणे झाली. आपल्या भाषणात आंबेडकर पुढे म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संस्थेला पीपल्स म्हणजे ‘लोकांची’ शिक्षण संस्था असे म्हटले आहे; परंतु बाबासाहेबांच्या नंतरच्या ट्रस्टींनी या संस्थेला आपली खाजगी मालमत्ता करून ठेवले होते हे सहन न झाल्याने आम्हाला ही संस्था ताब्यात घ्यावी लागली. लोकांनी आता या संस्थेकडे तटस्थपणे न पाहता माझी संस्था म्हणून संस्थेच्या विकासासाठी व विस्तारासाठी पुढे आले पाहिजे. संपूर्ण भारत देशावर नैतिक, बौद्धिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक असणारे संस्कार करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तुम्हा-आम्हावर टाकली आहे. मी चेअरमन असलो तरी केवळ तुमचा विश्वस्त आहे. खरे मालक तुम्ही आहात हे लक्षात ठेवून संस्थेच्या विकासाच्या कामाला लागा.” असा आदेश आवर्जून आनंदराज आंबेडकरांनी दिला. या प्रसंगी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आशिष गाडे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
–