आशाताई बच्छाव
“पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा!”
जिवलग दोस्त “हिरा” सारखे “मन” असलेल्या पवारची अनोखी कथा…!
(राजेंद्र पाटील राऊत)
वाचकहो,
पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा! या विधिलिखित भाकीताला आजवर कुणीही टाळू शकलेले नाही.जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक ना दिवस दुर इहलोकीच्या प्रवासाला निघून जायचे आहे.मात्र हे अंतीम सत्य आजही कुणी स्विकारायला तयारच होत नाही.जो तो या स्वार्थी व मतलबी दुनियेत स्वतः ला “राव” समजायला लागतो.पण…या कलियुगात असाही एक अवलिया जन्माला येऊन गेला तो म्हणजे माझा जिवलग दोस्त “हिरा” सारखे “मन” असलेल्या माझ्या दोस्तचा जन्म हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या शिरसोंडी या गावी आदिवासी भिल्ल कुटूंबात झाला.आज दुपारी १ वाजेच्या सुमारास त्याचे वयाच्या ७६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.आणि त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून क्षणभर अंगावर काटा फुटला व त्या बातमीवर विश्वासच बसता बसत नव्हता.पण सत्य हे स्विकारावेच लागते.हिरामण पवार व माझी समोरासमोर भेट न होताच आम्ही एकमेकांचे जिवलग दोस्त म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत सोबत होतो.माझ्या एक अडचणीच्या प्रसंगात मला हिरामण पवार याने कधी प्रत्यक्ष बघितले सुध्दा नव्हते तरी देखील हिरामण पवार मला माझ्या एका कौटुंबिक सदस्यांच्या सांगण्यावरून मदत करायला तयार झाले.हिरामण पवारने मला अडचणीच्या काळात मदत तर केलीच पण एखाद्या मोठ्या भावासारखा खंबीरपणे माझ्या पाठीशी अखेरपर्यंत उभा राहिला.हिरामण पवार हा जातीने जरी भिल्ल समाजात जन्माला आलेला असला तरी अशिक्षित असलेल्या हिरामण पवार यांनी कधीच जातीभेद बाळगला नाही.सगळयांच जातीधर्माच्या लोकांना मदतीसाठी धावून जातात कधी “मला काय मिळेल?”असा मतलबी व स्वार्थी विचार केला नाही.शिरसोंडी परिसरासह तिसगाव,झाडी उमराणे भागात आजही हिरामण पवार यांच्या एकनिष्ठ व प्रामाणिकपणाचे कौतुक केले जाते.मुखावर सदैव हास्य असलेला हा अवलिया आपल्यापेक्षा कुणी मोठा असो किंवा लहान प्रत्येकाला हसूनच साहेब म्हणणारा “खरा हिरा” आज आपल्यातून दूर इहलोकीच्या प्रवासाला निघून गेला.त्याचे सोबत घालवलेल्या आठवणी व प्रसंग स्मृतीत ठेवून… जिवलग दोस्त कसा असावा हे हिरामण पवार या अवलियाने प्रत्यक्षात श्रीकृष्ण सुदामा तर सयाजीराव महाराज गायकवाड व चिंधा भिल्लांच्या दोस्तीसारखाच अनोखा दोस्ताना निभावला.माणूस कुठल्या जातीत जन्माला येतो यावर त्याची किंमत ठरत नाही.तर जन्माला येताना फक्त श्वास सोबत घेऊन येणा-या व्यक्तीने मात्र स्व कर्तृत्ववावर स्वतः चा नावलौकिक व किर्ती वाढवायची असते.आणि तेच मोलाचे काम हिरामण पवार यांनी केले.मतलबी व स्वार्थी दुनियेत माझ्या या दोस्तांने फक्त आणि फक्त माणसं जोडलीत.त्यांच्या आठवणींचा हा स्मृती सुगंध सदैव दरवळत राहील.आणि पवार कुटुंबावर कोसळलेल्या या आकस्मिक दुःखात युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनल, युवा मराठा महासंघ महाराष्ट्र, आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र सहभागी असून, परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो एवढीच प्रार्थना करतो व थांबतो.ओम शांती..ओम शांती…