आशाताई बच्छाव
कचरा
रोजच्या दैनंदिन जीवनात आपण कितीतरी कचरा करत असतो.त्यात सर्वात जास्त भर पडते ती प्लॅस्टिकच्या कच-याची.प्लॅस्टिकचा शोध लागून शेकडो वर्षे झालीत.प्लॅस्टिक कधीही नष्ट होऊ शकत नाही.कचरा व्यवस्थापन करणे खरेतर खूप मोठे आव्हान आहे.माणूस रोजच्या जीवनात प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतो.हे प्लॅस्टिक अनेक प्रकारे आढळते.जसे प्लॅस्टिकच्या पिशव्या,चिप्सचे कवर, चाॅकलेटचे कवर इत्यादी.माणसे सर्रासपणे प्लॅस्टिक इकडे तिकडे फेकून देतात.मग हे प्लॅस्टिक नाल्या, नद्यांमध्ये, समुद्रात मोठ्या प्रमाणात जमा होते.कधीकधी तर मुकी जनावरे प्लॅस्टिकच्या पिशवीत फेकलेले पदार्थ खाताना त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जाते आणि त्यांना मोठी हानी होऊ शकते.सध्यातरी प्लॅस्टिकला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी कुठलाच उपाय नाही.
जसजशी लोकसंख्या वाढते आहे,तसतशी कच-याची निर्मितीही वाढते आहे.कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची शक्यता असते.कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी काही पध्दतींचा वापर केला जातो.जसे..रिसायकलिंग,कंपोस्टिंग इत्यादी.रोज हजारो टन कचरा निर्माण होत असतो.आता तर रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी कचरागाडी येत असते.त्यामुळे लोक कचरा कचरागाडीत टाकण्यास जागृत होत आहेत.पण सगळेच असं करत नाही.काही लोक आजही आपल्या आजूबाजूच्या परिसरात कचरा टाकतात.त्यामुळे कच-याला खूप दुर्गंधी सुटते आणि स्वास्थ्य खराब होण्याची शक्यता असते.कारखान्यांतूनही विषारी कचरा पाण्यात सोडल्या जातो.त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या जलचर प्राण्यांना फार नुकसान होते.जलचर प्राण्यांचे सेवन केल्यामुळे मानवाला देखील धोका संभवतो.यासाठीच कच-याचे रिसायकलिंग करणे महत्त्वाचे ठरते.दुसरा उपाय म्हणजे लॅंडफिल्स.यात जमीनीत मोठा खड्डा करून त्यात कचरा भरल्या जातो आणि त्यावर मातीचा थर दिला जातो.हा कचरा वर्षानुवर्षे आतमध्ये कुजत राहतो.अश्याप्रकारे कच-याचे खतामध्ये रूपांतर होते ज्याला कंपोस्टिंग म्हटले जाते.यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही.हे तयार झालेले खत झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरते.कच-याचे व्यवस्थापन करण्यामुळे वातावरण प्रदूषित होत नाही.त्यामुळे स्वच्छता राखली जाऊन सर्व लोकांना एक चांगले वातावरण मिळते.
कचरा व्यवस्थापनात कामगारांचा मोठा वाटा असतो.कामगार कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावत पर्यंत अनेक कामे करतात.त्यामुळे रोजगाराची संधीही निर्माण होते.कचरा व्यवस्थापनाची सुरूवात घरापासून व्हायला हवी.प्लॅस्टिक कच-याचा पुनर्वापर करावा.कचरा इकडेतिकडे न फेकता सुका आणि ओला कचरा वेगवेगळा गोळा करून तो कचरागाडीत टाकावा.कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
लैलेशा भुरे
नागपूर