Home चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

जिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

76
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0069.jpg

जिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

उद्योजकांनीही सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा

ना.मुनगंटीवार यांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा

चंद्रपूर/गडचिरोली,(ब्युरो चीफ सुरज गुंडमवार) :- जिल्ह्यात विविध खनिज संपत्ती व वनसंपत्ती आहे. जिल्हा प्रदूषणाच्या व तापमानाच्या बाबतीत देखील प्रथम क्रमांकावर आहे. याठिकाणी अनेक उद्योगधंदे/कंपन्या असून येथील कंपन्यांनी जिल्ह्यातील विकासाची नाविन्यपूर्ण कामे पुर्णत्वास नेण्यासाठी सी.एस.आर. निधी उपलब्ध करुन देऊन जिल्ह्याचा गौरव वाढविण्याकरीता योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डन) येथे आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव (वने) वेणुगोपाल रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबल प्रमुख)शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) महिप गुप्ता, वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) चे अधिक्षक अभियंता हेमंत पाटील, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, बल्लारपूरच्या तहसीलदार कांचन जगताप, खणिकर्म अधिकारी सुरेश नैताम, सीएसआर कमिटीचे अध्यक्ष, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच वनाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

जिल्ह्याच्या विकासाकरीता नाविन्यपूर्ण कामांमध्ये कंपन्यांनी सीएसआर निधी उपलब्ध करुन योगदान द्यावे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जगातील सर्वात जास्त वाघ या जिल्ह्यात आहे. अयोध्या येथे प्रभू रामाच्या मंदिरासाठी लागणारे काष्ठ हे चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात आले. तर सेंट्रल विस्टा(नवीन संसद)चा दरवाजा येथील लाकडापासून निर्मित आहे, हे जिल्ह्याचे सौभाग्य आहे. जिल्ह्याचा गौरव पुढे नेण्यासाठी देशातील 32 सैनिकी शाळांमधून अतिउत्तम अशी जिल्ह्यातील सैनिक शाळा आहे. मैसूरच्या आय.ए.एस अकादमीपेक्षा वनविभागाची फॉरेस्ट अकादमी अतिशय उत्तम आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली जंगलक्षेत्राचा गौरव म्हणून जोडण्यासाठी सर्वप्रथम बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले, हे केंद्र रोजगार देणारे केंद्र बनेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

50 एकरमध्ये 600 कोटी रुपये खर्च करून भव्य असे एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र उभे राहत आहे. यामध्ये महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणारे 62 कोर्सेस सुरू होत आहे. त्यासोबतच, आशियातील पहिले महिलांसाठीचे ट्रेडिशनल स्टेडियम या ठिकाणी तयार होत आहे. जिल्ह्याचा गौरव म्हणून देशातील पहिल्या तीन स्टेडियममध्ये सैनिक स्कूल येथील फुटबॉल स्टेडियमला युरोपियन फुटबॉल असोसिएशनने मान्यता दिली. संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त तीनच असून ते चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर स्टेडियम, सैनिक स्कूल व चंद्रपूर जिल्हा स्टेडियम या ठिकाणी आहे. जिल्हा प्रदूषणात तसेच तापमानात देखील प्रथम क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे बॉटनिकल गार्डन देखील जगात प्रथम क्रमांकावर रहावे. रणवीर कपूर, टायगर श्रॉफ व अभिषेक बच्चन या अभिनेत्यांनी चंद्रपूरच्या फुटबॉल ग्राउंडवर खेळण्याची उत्सुकता दर्शविली हे जिल्हयासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

पुढे बोलतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरचा गौरव वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र व समन्वयाने काम करण्याची भावना ठेवावी. येथील कंपन्या स्थानिक गावांच्या मागणीला धरून सी.एस.आरच्या माध्यमातून वाटर प्युरिफायर, गावातील छोटे-मोठे रस्ते पूर्ण करून देतात. जिल्ह्यात निधीची कुठलीही कमतरता नाही. मात्र, एखाद्या विकासकामांचे इस्टिमेट करतांना प्रशासन/शासनास अडचणी निर्माण होतात. व हे इस्टिमेट तयार करताना महीने व वर्ष लागतात. कंपनी त्यांच्या सीएसआर निधीमधून जे साहित्य खरेदी करतात ते प्रशासन त्यांच्या डीपीडीसीतून खर्च करू शकते. कंपन्यांनी त्यांचा सीएसआर निधी अशा ठिकाणी खर्च करावा, ज्याठिकाणी प्रशासन/शासनास कामे करतांना व कामाचे इस्टिमेट तयार करताना वर्ष लागतात. एखाद्या कंत्राटदारास काम गेल्यास सदर कंत्राटदार 6 महिन्याच्या कार्याला 7 वर्ष लावतात. अशाकार्यात कंपनीचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कंपन्यांच्या सीएसआरमध्ये या सर्व गोष्टी नसून कंपन्या त्यांच्यामार्फत निविदा काढू शकतात. कंपनीस्तरावर चांगल्या कंत्राटदाराची नियुक्ती करून विकासात्मक कामे चांगल्या नियोजनाने, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून सदर कामेही कमी कालावधीत पूर्णत्वास येऊ शकेल.
चंद्रपुरात एकूण 1 हजार 345 उद्योग आहेत. यामध्ये ग्रीनझोन मध्ये 708, ऑरेंज झोन 354 तर रेड झोन मध्ये 283 उद्योग आहेत. तसेच प्रदूषणात ज्या उद्योगाचा काहीही संबंध व भागीदारी नाही, अशा टाटा ग्रुपने 100 कोटी रुपये टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या निर्मितीसाठी उपलब्ध करून दिलेत. रेड झोनमधील कंपन्यांनी याबाबत मुल्यांकन करुन आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

कंपन्यानी जिल्ह्यातील विकासात्मक कार्यास हातभार लावावा. कंपनी सीएसआरच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करुन देऊ शकतात. या बॉटनिकल गार्डनच्या माध्यमातून जिल्ह्याचा गौरव वाढावा, हे गार्डन खुले विद्यापीठ असून बॉटनिकल गार्डन मनोरंजकच नाही तर ज्ञानवर्धक व रोजगार देणारे केंद्र बनेल. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना पर्यावरण, वृक्ष व प्राण्यांबाबत माहिती मिळेल. सायन्स पार्क, प्लॅनटोरियम, म्युझिकल फाउंटेन या ठिकाणी तयार होत असून सदर कंपन्यांच्या सीएसआर मधून सदर कामे पूर्णत्वास नेता येईल.

प्रास्ताविकेत प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबल प्रमुख)शैलेश टेंभुर्णीकर म्हणाले, जिल्ह्यात विविध खनिज संपत्ती व वनसंपत्ती आहे. येथील वनसंपत्तीत जैवविविधता आहे तसेच चंद्रपूर हे वनसंपदेचे प्रवेशद्वार आहे. ताडोबा हे जागतिक पातळीवर वनपर्यटनासाठीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यात वनसंपदा, वनस्पती, प्राणी याचे महत्त्व विशद करण्याकरीता व वनस्पतीचे संगोपन व संवर्धन करण्याकरीता या वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानामध्ये मध्य भारतातील वनस्पतीचे संवर्धन व संगोपन करण्यात येणार असून लागवड देखील करण्यात येणार आहे.

यावेळी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर यांनी वनविभागाच्या प्रकल्पाविषयीचे सादरीकरण केले. तदनंतर, वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी कंपनी प्रतिनिधी व सीएसआर कमिटीचे अध्यक्षांशी संवाद साधला.

Previous articleभाजपा महिला आघाडी गडचिरोलीच्या वतीने मा.पंतप्रधान मोदीजींचे अभिनंदन करून धन्यवाद दिले.
Next articleम्हसदीच्या आदर्श विद्यालयाच्या गणरायांचे सातव्या दिवशी उत्साहात विसर्जन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here