आशाताई बच्छाव
गणेश उत्सव हा भारतातील एक लोकप्रिय सण आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी ला हा उत्सव साजरा केला जात आहे. देशातील बऱ्याच राज्यात आज दुष्काळी परिस्थितीत पहायला मिळते. तरी देखील हा उत्सव गणपतीचा जन्मदिन म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जात आहे. गणेश उत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थी म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे. या उत्सवा दरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण असते. गणेश उत्सवाचा शुभारंभ हा लोकमान्य टिळकांनी समाजात एकी निर्माण करण्यासाठी केला. ती परंपरा आज महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. गणेश उत्सव हा साधारणपणे दहा ते अकरा दिवस चालणारा उत्सव आहे. छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशमंडळ या उत्सवात खूप सुंदर व आकर्षक देखावे तयार करतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढोल, ताशे, लेझीम इत्यादीच्या तालात गणेश मूर्तीचे विसर्जन करीत असताना भक्तिगीते,भावगीते, श्लोक यांच्या सुरात करावे. भक्तगण गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत लाडक्या गणरायाला निरोप देतात. गणेश उत्सवाने आपणास एकता व बंधूभावाची महत्त्वाची शिकवण मिळते. आजपासून सुरुवात होत असणाऱ्या अशा गणेशोत्सवाच्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा!
तसेच आजच्या पिढीला अष्टविनायकाची महती कळावी म्हणून पुढे अष्टविनायकाची माहिती देत आहोत. सौ.सविता तावरे स्पेशल रिपोर्टर मुंबई
अष्टविनायक गणपतीची माहिती
मोरगाव चा मयुरेश्वर अष्टविनायकातील सर्वात पाहिला गणपती म्हणून मोरगावचा गणपती ओळखला जातो. काळया दगडापासून बांधण्यात आलेले मंदिर हे बहमणिकाळात बांधले गेलेले गावाच्या मध्यभागी असणाऱ्या मंदिराला चारी बाजूने मनोरे आहेत. मुगल काळात मंदिरावर आक्रमण होऊ नये म्हणून या मंदिराची बांधणी मशिदीसारखी केली जाते. तशी बांधणी या मंदिरातही बघायला मिळते.तर येथील गणपती मागे एक रंजक कथा आहे.ती अशी की पूर्वी सिंधू या असुराने पृथ्वीवर उत्पाद माजवला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवाने गणपतीची आराधना केली. तेव्हा गणपतीने मयुरावर म्हणजेच मोरावर आरुढ होऊन सिंधू आसुराचा नाश केला. त्यामुळे येथील गणपतीला मयुरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या लक्षणीय आहे. पावसाळ्यात या गावात अनेक मोर दिसत म्हणून या गावाला मोरगाव असे नाव पडले. मोरगाव हे पुण्यापासून 70 ते 75 किलोमीटर अंतर आहे. मोरगावला जाण्यासाठी तुम्ही पुणे, चौफुला या मार्गे किंवा सासवड जेजुरी या मार्गे मोरगावला जाऊ शकता.
सिद्धटेक चा सिद्धिविनायक अष्टविनायका मधील दुसरा गणपती म्हणजे सिद्धिविनायक. अष्टविनायका मधील हा एकमेव असा गणपती आहे की त्याचे तोंड उजव्या बाजूला आहे. या गणपती मागील रंजक कथा ही अशी. मधु व काही तग या असुराशी भगवान विष्णू अनेक वर्ष लढत होते. मात्र त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करण्यास सांगितले. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून असूरांचा वध केला. छोट्याशा टेकडीवर असलेल्या या मंदिराचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. हे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. ही मूर्ती स्वयंपासून मूर्तीचे तोंड उत्तर दिशेला आहे. मूर्तीची सोंड उजवीकडे असल्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. या देवाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे पाच किलोमीटर फिरावे लागते. सिद्धटेक हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येते. पुण्यापासून शंभर किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर लागते.
पाली चा बल्लाळेश्वर अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर हा गणपतीओळखला जातो. अष्टविनायकातील हा एकच गणपती आहे की जो त्याच्या भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. त्याच्या या भक्ती पायी त्याचे वडील कल्याण शेठ व गावकऱ्यांनी मिळून त्याला बेदम मारून एका खोलीत कोंडून ठेवले. तेव्हा गणपतीने ब्राह्मणाच्या वेशात येऊन बल्लाळला दर्शन दिले. तेव्हापासून तेथील गणपती बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाला. या गणपतीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या एकाच गणपतीच्या अंगावर उपरणे आणि अंगरखा अशी वस्त्र असतात. नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे रूपांतर दगडी मंदिरात केले. या मंदिराची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की जेव्हा सूर्य उगवतो. तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एका तलावाचे पाणी मूर्तीच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यां पासून बनवलेले आहेत.पाली हे गाव पुण्यापासून 110 किलोमीटरच्या अंतरावर आहे .पुणे, लोणावळा, खोपोली या मार्गे आपण पाली या गावी जाऊ शकतो.
महड चा वरदविनायक अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून महडचा वरद विनायक पूजला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. या गणपती संदर्भात एक पौराणिक आख्यायिका सांगितली जाते ती अशी. एक वचनकरी नावाचे एक ऋषी होते, एकदा त्यांच्या आश्रमात राजा रूखमानंद यांनी भेट दिली. त्यावेळी ऋषी पत्नी त्यांच्या रूपावर मोहित झाली. तिने त्यांना आपल्या आश्रमात बोलावले. मात्र त्यांनी तिकडे जायला नकार दिला. ही गोष्ट जेव्हा देवांचा राजा इंद्राला कळाली. तेव्हा त्याने रुक्मानंदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. त्यातून तिला गुटसामान्य नावाचा मुलगा झाला. मोठेपणी गुटसामान्याला आपल्या जन्माची कथा समजल्यानंतर त्याने आईला श्राप देऊन मोहरीचे झाड बनवले. तिनेही तुझा मुलगा राक्षस होईल अशा श्राप दिला. शापित गुटसामान्य पुष्पक जंगलात गेला व गणेशाची पूजा करू लागला. त्याला तेथे एक देऊळ सापडले तेच हे वरदविनायकाचे मंदिर. असे म्हणतात की, गणेश येथे वरदविनायक मंदिर समृद्धी व यश देणारा या रूपात राहत असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू फोडकर यांना तेथील तलावात 1690 साली सापडली .1725 साली कल्याणच्या सुभेदार रामजी महावीर देवळकर यांनी मंदिर बांधले व महाड गावही वसवले. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटत असतो. असे म्हणतात की, हा दिवा 1892 पासून पेटत आहे. पुणे- मुंबई महामार्गावर खोपोली जवळ हा गणपती आहे. पुण्याहून अंदाजे 88 किलोमीटरवर हे मंदिर आहे.
थेऊर चा चिंतामणी अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजेच थेऊरचा चिंतामणी . ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी या ठिकाणी गणपतीची आराधना केली होती. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले अशी एक आख्यायिका सांगितली जाते. या गणपती बद्दल आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी राजा अभिजीत व राणी गुणवंतीचा मुलगा गुणा याने कपिल मुनीकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिल मुनींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला हे रत्न गुण्याकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुण्याचा वध करून हे रत्न कपिल मुनींना परत आणून दिले. मात्र कपिल मुलींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले त्यांची ही चिंता दूर झाल्यामुळे येथील गणपती चिंतामणी या नावाने ओळखला जाऊ लागला . हे भव्य आणि आकर्षक मंदिर पेशव्यांनी उभारले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून उभारलेले आहे. त्याकाळी हे मंदिर बांधण्यासाठी चाळीस हजार रुपये इतका खर्च आला होता असे नोंद आढळते. गणपतीची मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या दोन्ही डोळ्यात लाल म्हणी व हिरे आहेत. वयाच्या 27 व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षय रोगाने ग्रासले तेव्हा त्यांना तेथेच आणण्यात आले होते.या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मावळली. व त्यांच्या पत्नी रमाबाई सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ या मंदिराच्या बाजूला एक बाकमान उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणीच मोरया गोसावींना सिद्धी प्राप्त झाली हे सांगण्यात येते. हे गाव पुण्यापासून अवघे वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. पुणे- सोलापूर महामार्गावर हडपसर, लोणी मार्गे आपण थेऊर या गावी जाऊ शकतो.
लेण्याद्री चा गिरीजात्मक अष्टविनायकापैकी सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातील हा एकमेव गणपती आहे हा डोंगरात एका गुहेत वसलेला आहे. कुकडी नदीच्या तीरावर हे गाव वसलेले आहे. लेण्याद्री जवळच्या या डोंगरात 18 गुहा आहेत. यातील आठव्या गुहेत गिरीजात्मकाचे मंदिर आहे. या गुहेला ‘गणेश लेणी’ असेही म्हणतात. या मंदिरात येण्यासाठी 307 पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण मंदिर एका अखंड दगडापासून बनवलेले आहे. ह्या गणपतीची तोंड उत्तर दिशेला असून मूर्तीची एकच बाजू सगळ्यांना दिसते. अष्टविनायकातील इतर मूर्ती प्रमाणे ही मूर्ती आखिव व रेखीव नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवलेली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहील. गुहेत एकही विजेचा बल्ब नाही. ही गुहा कधी व कोणी बनवली याची नोंद नाही. पुणे नाशिक महामार्गावर जुन्नर जवळ हे देऊळ आहे. पुण्यापासून अंदाजे १०० किलोमीटरच्या अंतरावर हे ठिकाण आहे.
ओझर चा विघ्नहर अष्टविनायकातील सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर या गणपतीला ‘विघ्नेश्वर’ म्हणूनही ओळखलं जातं. विघ्न म्हणजे कार्यात येणारी बाधा हर म्हणजे त्याला दूर करणारा. या मंदिरा बाबतीत एक आख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे अशी राजा अभिनंदन आणि त्रिलोकाधिश होण्यासाठी एक यज्ञ सुरू केला. त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नेश्वर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यासाठी सांगितले. परंतु या विघ्नसुराने एक पायरीवर जाऊन सर्वच यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली. त्यामुळे ऋषीमुनींनी विघ्नसुरांचा बंदोबस्त करण्यासाठी गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नेश्वर गणपतीला शरण आला. गणपतीने त्याला जिथे माझी पूजा केली जाते तिथे न येण्याच्या अटीवर त्याला सोडून दिले . विघ्नसुराने गणपतीला विनंती केली की माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही येथेच वास्तव्य करावे. गणपतीने विघ्नसुराची ही अट मान्य केली व तो विघ्नहर या नावाने तिथे वास्तव्य करू लागला. मंदिराच्या चारही बाजूने सुरक्षित भिंत आहेत. गणपती पूर्वाभिमुख आहे. 1845 साली चिमाजी आप्पा यांनी मंदिराचे बांधकाम केले. पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर पुणे-नाशिक रोडवर ओझर गाव आहे.
रांजणगाव चा महागणपती अष्टविनायकातील सर्वात शेवटचा म्हणजेच आठवा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. तर या गणपती मागे एक रंजक कथा ही अशी. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकराने गणपतीची या ठिकाणी पूजा केली होती व या ठिकाणी एक मंदिर बांधले होते. त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले, आता रांजणगाव म्हणून ओळखले जाते. या मूर्तीचे तोंड पूर्वेकडे असून कपाळ मोठे आहे. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात अशी या मंदिराची रचना आहे. या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकाच्या काळातले असावे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिरात भेट द्यायचे. त्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले. पुणे- अहमदनगर रस्त्यावर 50 किलोमीटरच्या अंतरावर रांजणगाव पडते.