आशाताई बच्छाव
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचा- अॅड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी,(सुनील धावडे) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करण्याबाबत प्रदेश भाजपाकडून कोणतेही आदेश आलेले नाही. निवडणुका लढवण्याबाबतच्या सूचना काही दिवसांनी येतील. परंतु तोपर्यंत कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती आपापल्या वाडी, गाव जि. प. गटात पोहोचवली पाहिजे. केंद्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचा. सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक निवडणुकीत विजयी व्हायचे आहे, असा विचार करा. निवडणुका होईपर्यंत विद्यमान भाजपा पदाधिकाऱ्यांना पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी रत्नागिरी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये दिली.
भाजपच्या आज झालेल्या बैठकीला कार्यालय खचाखच भरले होते. निवडणुका, विकासकामांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत झाली. कोरोनानंतर पुन्हा एकदा भाजपाने ऑफलाइन बैठका घेण्यास सुरवात केली आहे. बूथ कमिट्यांच्या बैठका येत्या १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याद्वारे गावागावांत बूथ पुन्हा सक्रिय करून विकासकामांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
अॅड. पटवर्धन यांनी सांगितले की, राज्यात आपले सरकार आहे. त्यामुळे विकासकामे धूमधडाक्यात होण्यासाठी प्रयत्न आहे. याकरिता पदाधिकाऱ्यांना महिन्यातून एकदा मुंबईला जाण्याची संधी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन दिवसांत समिती गठित करून पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहोत. ज्या बुथवर मतदान कमी झाले आहे ते बूथ शोधून तिथे जास्त मतदान होण्याकरिता प्रयत्न आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यामुळे अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. निवळी- जयगड रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला आहे. याबाबत ते लवकरच निर्देश देतील. आता आपण पाठपुरावा केला पाहिजे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ रत्नागिरीतील अनेकांना मिळत आहे. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत म्हणून वाडीवस्तीत पोहोचले पाहिजे. सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक निवडणुकीत विजयी व्हायचे आहे असा विचार करा. भाजपाने २ खासदार ते ३०३ खासदारांपर्यंत मजल मारली आहे.
बैठकीला व्यासपीठावर जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर ,ऐश्वर्या जठार,विजय सालीम, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुकासरचिटणीस उमेश कुलकर्णी, ओंकार फडके , तनया शिवलकर, नंदकुमार बेंद्रे उपस्थित होते. तसेच विवेक सुर्वे, उमेश देसाई, सरपंच मंजिरी पाडाळकर, सरपंच संदीप शिंदे, किसन घाणेकर, पिंट्या निवळकर, अशोक वाडेकर, यांच्यासमवेत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.