Home नांदेड लसीकरण मोहिमेमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा व लसीकरण मोहिम यशस्वीरित्या...

लसीकरण मोहिमेमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा व लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा – जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

78
0

राजेंद्र पाटील राऊत

लसीकरण मोहिमेमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा व
लसीकरण मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा
– जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

जालना, दि.१४ – कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा दि. 16 जानेवारीपासुन संपुर्ण देशभरात सुरु होत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी या लसीकरणामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवुन लस टोचुन घेत जालना जिल्ह्यात लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले.
कोव्हीड 19 लसीकरणाच्या अनुषंगाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज दि. 14 जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री बिनवडे बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनखेडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, गेल्या वर्षभरात कोव्हीड 19 या महामारीच्या परिस्थितीमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे कोव्हीडचा मुकाबला आपण यशस्वीरित्या करु शकलो. कोव्हीड19 सोबतच्या लढाईचा हा अंतिम टप्पा असुन या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्वाची असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला ही लस देण्यात येणार असुन लस देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणीही करण्यात आलेली आहे. लसीकरणासाठी आवश्यक असलेली नोंद करण्यापासुन कोणी वंचित राहिले असल्यास तातडीने नोंदणी करुन प्रत्येकाने लस घ्यावी. तसेच लस घेतल्यानंतर ती सुरक्षित असुन तसा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी केले.

यावेळी डब्ल्यूएचओचे डॉ. मुजीब यांनी लसीकरणाच्या अनुषंगाने पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन माहिती देण्याबरोबरच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
जालना जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे 14 हजार 22 डोसेस प्राप्त
जिल्ह्यात चार ठिकाणी होणार लसीकरण
दि. 16 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यात कोव्हीड 19 च्या लसीकरणाचा चार ठिकाणी शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, जालना, ग्रामीण रुग्णालय, परतुर, ग्रामीण रुग्णालय, भोकरदन तसेच उपजिल्हा रुग्णालय अंबड या केंद्राचा समावेश आहे. सिरम इन्स्टीट्युटच्या कोविशिल्डचे 14 हजार 22 डोसेस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. लसीकरणासाठी चारही ठिकाणी प्रशिक्षित वर्ग ठेवण्यात आला असुन पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना लस टोचण्यात येणार असुन दरदिवशी 100 व्यक्तींना लस टोचण्याचे नियोजन या केंद्राच्या माध्यमातुन करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी दिली.
जिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र व शित साखळी कक्षाची
जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी
दि. 16 जानेवारी पासुन जिल्ह्यात सुरु होणाऱ्या कोव्हीड 19 लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयामध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण कक्षाची तसेच जिल्ह्याला प्राप्त झालेल्या कोविशिल्ड डोसेस ठेवण्यात आलेल्या शित साखळी कक्षाची जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी पहाणी करत यामध्ये कुठल्याही प्रकारची उणिव राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here