• Home
  • माँल, उद्योग, उर्वरित दुकाने पावसाळ्यापूर्वी कामांसाठी उघडणार – जिल्हाधिकारी

माँल, उद्योग, उर्वरित दुकाने पावसाळ्यापूर्वी कामांसाठी उघडणार – जिल्हाधिकारी

⭕ माँल, उद्योग, उर्वरित दुकाने पावसाळ्यापूर्वी कामांसाठी उघडणार – जिल्हाधिकारी ! ⭕
नाशिक 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

नाशिक : टाळेबंदीच्या चवथ्या टप्प्यात लाल क्षेत्रात मॉल, उद्योग तसेच उर्वरित दुकाने, प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी नागरिकांना तेथून खरेदी करता येणार नाही. कारण मॉल आणि दुकानांना स्वच्छता, यंत्रसामग्रीची दुरुस्ती आदी पावसाळापूर्व कामे करण्याची मुभा देण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्य़ात अत्यावश्यक सेवा वगळता रात्री सात ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदी राहणार आहे. शुक्रवारपासून या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे.

याशिवाय वाणिज्यिक कामे त्यांना करता येणार नाहीत.
लाल क्षेत्रात टॅक्सी, रिक्षा यांना परवानगी नाही. पण बिगर लाल क्षेत्रात जिल्ह्य़ांतर्गत बस वाहतूक ५० टक्के क्षमतेने चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्र हे लाल तर उर्वरित संपूर्ण ग्रामीण भाग हा बिगर लाल क्षेत्रात वर्गीकृत करण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत ३१ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या जाणार आहेत.

जिल्ह्य़ात आधीप्रमाणे एका ठिकाणी एकाच वेळी पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे. शारीरिक अंतराच्या निकषाचे प्रत्येकाला पालन करावे लागेल. सायंकाळी सातनंतर सकाळी सातपर्यंत अनावश्यक फिरण्यास, मुक्तपणे संचाराला मनाई करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात भाजीपाला, फळे, किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांसाठी सकाळी १० ते दुपारी चार ही वेळ निश्चित करण्यात आली असून इतर भागात उपरोक्त दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत उघडण्यास परवानगी आहे. ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांआतील मुलांना बाहेर फिरण्यास प्रतिबंध आहे. अत्यावश्यक गरजा, वैद्यकीय सेवा घेण्यासाठी संबंधितांना बाहेर पडण्याची मुभा राहील, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

anews Banner

Leave A Comment