आशाताई बच्छाव
महिला दिन निमित्त चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला महिला पोलिस व महिला होमगार्ड चा सन्मान
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – 08 मार्च 2025 रोजी महिला दिनानिमित्त चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विशेष उपक्रम राबविण्यात आला असून पोलीस ठाण्याचा पूर्ण कार्यभार महिलांकडे सोपविण्यात आला होता.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यक्षमतेचा सन्मान व आत्मविश्वास वाढविणे हा होता असे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले.
यावेळी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून महिला हवालदार विमल सानप, अनिता सुरवाडे यांची नेमणूक करण्यात आली होती तर ऑफिस हजर मदतनीस म्हणून महिला कॉन्स्टेबल हर्षला बनसोड, सबा शेख यांनी जबाबदारी पार पाडली.
वायरलेस ड्युटी साठी महिला कॉन्स्टेबल स्नेहल मांडोळे यांची नियुक्ती करण्यात आली तर हॉस्पिटल मधून येणाऱ्या एम.एल.सी. प्रकरणांसाठी महिला पोलीस नाईक मालती बच्छाव यांनी जबाबदारी सांभाळली या सर्वांनी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या या कार्याची अपर पोलीस अधीक्षक सौ. कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांनी प्रशंसा केली.
यावेळी त्यांच्यासह महिला होमगार्ड लता अहीरे, प्रज्ञा संत, प्राजक्ता घोरपडे, सुनिता पवार, वैशाली चौधरी, भाग्यश्री सूर्यवंशी, सुषमा सुळे, निलीमा पवार यांचा पोलीस रेझोंग डे निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या फ्रेम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.