Home नांदेड रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड.

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड.

54
0

आशाताई बच्छाव

1001214303.jpg

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : नुकताच राज्यस्तरीय पिकस्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेत रब्बी ज्वारी व करडई या पिकाचे उत्पन्न व उत्पादन बाबतीत योग्य नियोजन करून भरघोस पिक घेऊन नांदेड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी राज्यस्तरावर क्रमांक पटकावले आहेत.

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येते.

या पिकस्पर्धेत लोहा तालुक्यातील सायाळ येथील कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून ओळखले जाणारे तसेच खंडीभर लाल कंधारी गाई जनावरे सांभाळून शेती करणारे शेतकरी रत्नाकर पाटील ढगे सायाळकर यांनी जिल्ह्यातून रब्बी ज्वारीमध्ये राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून रुपये 30,000 चे पारितोषिक मिळवीले आहे. त्यांनी सांगितले की, यश मिळवताना जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रीसूत्रीचा वापर करून एक आदर्श उत्पादन घेण्यास मी यशस्वी झालो आहे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन त्यांनी आपल्या शेतीत सतत सुधारणा घडवून आणल्या आहेत. विपरीत परिस्थितीत चांगले उत्पादन घेऊन त्यांनी पंचक्रोशीत आपली छाप सर्वसामान्य शेतकरी वर्गात निर्माण केल्यामुळे आज हजारो शेतकरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचे धडे गिरवीताना पाहावयास मिळत आहेत. त्यांनी चालवत असलेल्या अन्नदाता सुखी भव या ग्रुपवर ते अनेक शेतकरी बांधवांना विनामुल्य शेती पिक मशागत व एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करत असतात तसेच लाल कंधारी जातीचे त्यांच्याजवळ वीस जनावरे आहेत.

तसेच करडई या पिकामध्ये देगलूर तालुक्यातून माधव शंकरराव पाटील रा.चैनपूर यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून रोख रक्कम 50,000 चे पारितोषिक व सुनील नामदेव चिमणपाडे रा. कुडली यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रोख रक्कम 40,000 चे पारितोषिक मिळवण्याचा बहुमान मिळविला आहे. यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक पिकपद्धतीचा अवलंब केला. योग्य वाण, योग्य वेळी मशागत, शेंद्रीय खताचा मुबलक वापर करून जमिनीचा कस वाढवून जमिनीचा पोत सुधारून व योग्य खताचा ताळमेळ घालून शेती क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन राज्यस्तरावर अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला.

राज्यस्तरावर करडई या पिकात प्रथम व द्वितीय क्रमांक व रब्बी ज्वारी या पिकात तृतीय क्रमांक आल्याबद्दल दत्तकुमार कळसाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी विजेते शेतकऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. व पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here