आशाताई बच्छाव
आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐटीत व रुबाबात जीवन जगणारे आवारे बाबा—- “युवा मराठा न्यूजचे निफाड तालुका प्रतिनिधी आणि युवा मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रसिध्दीप्रमुख श्री.रामभाऊ आवारे सर यांच्या पिताश्रीचे आज पुण्यस्मरण दिन त्यानिमित्ताने हा विशेष लेख व विठ्ठलराव आवारे बाबा यांच्या पावन स्मृतीस पुण्यस्मरण दिनानिमित्त युवा मराठा परिवाराचे विनम्र अभिवादन!”
उतरत्या वयातही शेवटच्या क्षणापर्यंत परिवाराकडून वेळेवर सर्व सेवा करून घेणारे विठ्ठलराव जयवंत आवारे (आवारे बाबा) यांचा आज पुण्यस्मरण दिन—
बघता बघता वर्ष झाले
पण स्मृती अजुनही तशाच जिवंत आहे
दिवस किती पटकन सरतात पण कायम स्मरणात राहणा-या व्यक्ती कधीच विस्मरणात जात नाहीत तशेच माझे एक पेशंट…पेशंट नव्हेतच, माझे मार्गदर्शक,आयुष्याने दिलेले अनुभव,बसलेले चटके,व त्यातुन मिळालेली शिकवण हे सांगणारे एक “खुली किताब” वयात खुप अंतर असुनही मित्रत्वाच्या नात्याने फुलत जाणारा एक संवाद व त्यातुनच जुळत गेलेले ऋणानुबंध ,माणुस म्हणून वाचण्याचा माझाही छंद व खुप फाफट पसारा व मित्र न वाढवता मोजक्याच लोकांशी होणारा माझा मनमोकळा संवाद त्यातलेच एक माझे “आवारे बाबा” पांढरा शुभ्र सदरा,धोतर, कडक टोपी व सवयीने कायम सांभाळावा लागणारा चष्मा व दवाखान्याच्या पाय-या चढतांनाच कडक आवाजात दिली जाणारी हाक “हाय का देवा ?”
आवारे बाबा…मला ह्या व्यक्तीबद्दल कायमच कुतुहल राहिलंय. कारण काय तर ही व्यक्ती खुप मोठी,पैसेवाली,जमिनदार होती म्हणुन नक्कीच नाही तर आदर मात्र कायम राहिला. कारण ह्या व्यक्तीने मोलमजुरी करुन आपले सर्व मुले पदवीधर केली,शिक्षण आवश्यक आहे व आपली मुले शिकली पाहिजे हा ध्यास ह्या माणसाने घेतला होता व तो पुर्ण केला,आज बाबांची सर्व मुले पदवीधर आहेत.मोठी मुलगी अशिक्षित असुन ही नोकरी करणा-या मुलाला दिली, जुळ्या मुलांपैकी मोठे सुपुत्र रामभाऊ हे एम ए बी एड असुन आज महाराष्ट्रभर लेखणीच्या माध्यमातून सर्वांना ज्ञात असून वारकरी संप्रदायात स्टार प्रचारक, वारकरी मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष, माहिती अधिकार संघटना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, युवा मराठा महासंघ राज्य प्रसिध्दी प्रमुख, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख,रासाका बचाव कृती समिती मार्गदर्शक, हिंदू रक्षक दल नाशिक जिल्हा अध्यक्ष आदी विविध पदांवर कार्यरत असुन बाबांनी दिलेल्या संस्काराने आज राज्यस्तरीय 261 पुरस्काराने सन्मानित असून सादर सरळ जीवन व प्रचंड जनसंपर्क असल्याने पंचक्रोशी सह नाशिक जिल्ह्यात त्यांचे नाव आहे.लहान मुलगा लक्ष्मण हे बी ए बी एड असुन चांदवड तालुक्यातील पाथरशेंबे येथील श्रीकृष्ण विद्यालयात इंग्रजी विद्यालयाचे अध्यापक म्हणून कार्यरत आहे. तीन नंबरचा मुलगा भारत चांगल्या पद्धतीने इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये आउटडोर व इनडोअर काम करत आहे. लहान मुलगी अर्चना ही पण एम ए बी एड असून आगासखिंड येथील शताब्दी या नावाजलेल्या संस्थेत अध्यापिका म्हणून कार्यरत आहे. बाबांची चारही नातू उच्च शिक्षण घेत आहे. एक नातू (तेजस) ॲग्री, एक नातू (आदित्य) ॲनिमेशन, एक नातू (आविष्कार) डॉक्टर ,व एक नातू (पलाश) आयटी इंजिनिअर या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीने गुण मिळवून शिक्षण घेत आहे हे श्रेय केवळ आवारे बाबांचे.
जे पेराल तसे उगवेल ह्या न्यायाप्रमाणे बाबांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतरही बाबांच्या पांढ-या शुभ्र सद-यात व धोतराच्या परीट घडीत फरक पडला नाही,कडक आवाजात हाक देताच दिमतीला हजर असणारे मुले व सुना मी स्वतः बघितल्यात काही गोष्टी– बेडवरुन हलणे मुश्कील झालेले असतांनाही सर्व काही मनाप्रमाणे घडवु शकणारी व्यक्ती निश्चितच पुण्यवान असते अथवा तिच्या पोटी जन्म घेणारे अपत्य संस्कारी ,तसेच आज राम , लक्ष्मण ,भरत हे मुले व कन्या व शेवट पर्यंत आपल्या वडीलांप्रमाणे काळजी घेणा-या सुना ही बाबांनी कमविलेली संपत्ती होती.रात्री -बेरात्री शौचाला घेऊन जाणे,रात्रीचे किती ही वाजलेले असले तरी कोणाला जाऊन आणल्यावर गरम पाण्याने व साबुन लावुन आंघोळ घालून पुन्हा बाबांना त्यांच्या बिछान्यावर व्यवस्थितपणे ठेवून, पिण्यासाठी पाणी देऊन, अंगावर उबदार कपडे टाकते हा मुलांचा,सुनांचा व नातवांचा नित्यक्रम असायचा.कधी कधी आमचे जिवलग मित्र तसेच वारकरी संप्रदायाचे पाईक पत्रकार रामभाऊ आवारे सर यांना मी म्हणायचो , खुप काळजी घेता सर तुम्ही बाबांची -तर म्हणायचे जन्मदात्या बापाची सेवा आमच्या परिवाराकडुन घडते हेच आमचं भाग्य. बाबांच्या दररोज वेळेवर सर्व विधी चहा जेवण असल्याने बाबांनी वयाची शंभरी पार करत 104 व्या वर्षांपर्यंत आनंदाने जीवन जगून घेतले. बाबांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार केले. गजानन महाराज प्रकट दिनी सर्व परिवाराशी बोलून त्यांनी श्री गजानन महाराज प्रकट दिनी आपला देह त्याग केला. बाबांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी म्हणून सर्व परिवाराने पाच दिवस भजनाचा कार्यक्रम घेऊन बाबांना श्रद्धांजली अर्पण केली. आज पुण्यस्मरणा निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना सुप्रसिद्ध रामायणाचार्य ह भ प भास्कर नाना रसाळ आहेरगावकर यांचा सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम घेऊन बाबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. बाबांची एकूण सर्व जीवन कार्य हे सर्व मी जवळुन बघितल्याने अशा समाधानी व ख-या अर्थाने श्रीमंत आवारे बाबांस माझ्या वतीने भावपुर्ण आदरांजली.
डॉ चंद्रशेखर सातभाई (बाबांचे फॅमिली डॉक्टर) वनसगाव