आशाताई बच्छाव
पीएम श्री शाळांच्या शिक्षकांसाठी अभ्यास दौरा
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 22/03/2025
जालना पीएम श्री म्हणजे प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून या शाळा देशभरात होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यातील सर्व तरतुदी या शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत. देशभरात 15 हजाराहून अधिक शाळा या निर्माण होत आहेत. या शाळाला उत्कृष्ट पायाभूत सुविधा तसेच उत्तम मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. जालना जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात 12 व दुसऱ्या टप्प्यात सहा अशा एकूण 18 शाळा पीएम श्री शाळा म्हणून तयार झाल्या आहेत. या शाळांमधील सर्व शिक्षकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, मुलांची सुरक्षितता, शाळेचा सुंदर परिसर, सुंदर पर्यावरण, स्वच्छ शाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, विज्ञान प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य अशा विविध योजना तयार करून त्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहेत. या शाळा आपल्या तालुक्यातील आदर्श शाळांम्हणून उदयाला येत आहेत.
या शाळांमधील शिक्षकांसाठी आता दोन अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील शिक्षकांसाठी राज्यांतर्गत नागपूर चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांना भेट देण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यातील शाळांच्या शिक्षकांसाठी राज्याबाहेर म्हणजे गुजरात राज्यात अहमदाबाद गांधीनगर बडोदा नर्मदा या जिल्ह्यातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्था व पीएम श्री शाळांना भेटी देऊन तेथील चांगल्या बाबी आपल्या शाळांमध्ये राबविण्याच्या दृष्टीने हा अभ्यास दौरा होत आहे. गुजरात शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गांधीनगर, बडोदा, विविध पी एम श्री शाळा अशा संस्थांना भेटी देऊन त्या संस्थांचे कार्य जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा होत आहे. या अभ्यास दौऱ्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालनाचे वरिष्ठ आणि व्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत यांच्यासह जिल्हा परिषद प्रशाला शहागड व जिल्हा परिषद प्रशाला धावडा या शाळेतील 22 शिक्षक मुख्याध्यापकांचा समावेश आहे.