आशाताई बच्छाव
गायत्री नगरात पाण्याचं दुर्भिक्ष, नगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
गायत्री वाशियांची पाण्यासाठीची भटकंती त्वरित थांबविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 20/03/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाळ्यामध्ये जालना शहरासह जिल्ह्यातच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे नद्या नाल्यांना पूर आले नाही. त्यामुळे जमिनीतही पाणी पातळीत वाढ अपेक्षित प्रमाणे झालेली नसल्याकारणाने यावर्षी लवकरच म्हणजे सुरू असलेल्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जालना शहरातील अनेक भागांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालं असल्याचे अनेक उदाहरणं पहावयास मिळत आहेत. यामध्ये गायत्री नगर परिसरातही जलस्रोत कोरडे ठाक पडले असल्यामुळे लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे गायत्री नगर मध्ये पालिकेची पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन टाकलेली असून नागरिकांनी नळ कनेक्शनही घेतलेले आहेत परंतु असे असतानाही पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गायत्री नगर वाशी यांना पाणीपुरवठा केला जात नाही. अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही पालिका प्रशासनाने लोकांच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून लोकांच्या डोळ्यात धुळफेक केली असून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे आता गायत्री नगरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे याला सरळ सरळ पालिका प्रशासन जबाबदार आहे. स्थानिक पालिका प्रशासनाने लोकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती त्वरित थांबवून पाईपलाईनचे कनेक्शन जोडून युद्धपातळीवर गायत्री नगर वाशीयांना पाणीपुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे अन्यथा जालना महानगरपालिकेवर पाण्यासाठी हंडा मोर्चा काढणार असल्याची माहिती गायत्री नगर येथील नागरिकांनी दिली आहे.
राजकीय पक्षांनी केवळ मतदानासाठी गायत्री वाशियांचा वापर केला असून त्यांच्या जीवनावश्यक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे का ?असे अनेक प्रश्न या निमित्ताने नागरिकांच्या मनात उपस्थित झाले आहेत. प्रशासनाच्या या उदासीनतेच्या धोरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पहावयास मिळत असून प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन गायत्री वाशीयांना पाणीपुरवठा करण्याची मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.