आशाताई बच्छाव
गुरदाळ खुन प्रकरणात १२ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ! न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
बी.जी.शिंदे उदगीर / प्रतिनिधी
राजकीय विरोध व वैयक्तिक द्वेषातून गुरदाळ ( ता.उदगीर ) येथील दिगांबर पाटील यांची घरी जेवण करीत असताना डोक्यात काठीने हल्ला करुन खून केला होता.
उदगीर – राजकीय विरोध व वैयक्तिक द्वेषातून गुरदाळ ( ता.उदगीर ) येथील दिगांबर पाटील यांची घरी जेवण करीत असताना डोक्यात काठीने हल्ला करुन खून केला होता.
या प्रकरणी शुक्रवारी (ता. २१) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम. कदम यांनी सदर गुन्ह्यातील तेरा आरोपी पैकी एक मयत वगळून बारा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
उदगीर तालुक्यातील गुरदाळ येथे २३ मे २००३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिगंबर यशवंतराव पाटील (वय-५८ वर्षे) हे घरी जेवण करीत असताना आरोपींनी संगनमत करुन घरात घुसून राजकीय शत्रुत्व व वैयक्तिक द्वेषापोटी ओसरीत जेवताना त्यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. व त्यांना खेचून आणून प्रचंड असा लाठी हल्ला करीत त्यांचा जागीच खुन केला. व त्यांच्या घरातील इतर लोकांना व नातेवाईकांना जबर जखमी केले. याप्रकरणी मयताचा मुलगा बसवराज दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर प्रकरणात पोलिसांच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
सदरील खटल्याची सुनावणी पीठासीन अधिकारी सत्र न्यायाधीश श्रीमती आर.एम. कदम यांच्या न्याय दालनात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकुण तेरा साक्षीदाराची साक्ष नोंदविली. तर बचाव पक्षाचे वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी दरम्यान एकुण तेरा आरोपी पैकी एका आरोपीची मृत्यू झाला आहे.
सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अॅड. गौसपाशा सय्यद यांना अॅड. शिवकुमार गिरवलकर, अॅड. एस. आय. बिराजदार, अॅड, बालाजी शिंदे, अॅड. प्रभुदास सुर्यवंशी यांनी सहकार्य केले. व तसेच कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेडकाँस्टेबल अक्रम शमशोदिन शेख यांनी सहकार्य केले. खटल्याचा निकाल लागणार असल्याने न्यायालय परिसरात नागरिक, नातेवाइकांची प्रचंड गर्दी झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
*या बारा आरोपीना झाली जन्मठेपेची शिक्षा…*
आरोपी शिवराज हणमंतराव पाटील, दिलीप शिवराज पाटील, रामराव भगवंतराव उजळंबे, शंकर विठ्ठलराव पाटील, माधव राजेंद्र शिंदे, संजय शिवराज पाटील, राजकुमार शिवराज पाटील, राजेंद्र बाजीराव शिंदे, विनायक हणमंतराव पाटील, रतिकांत विनायक पाटील, मारोती दौलतराव बिरादार, विजयकुमार शिवराज पाटील, विठ्ठल माधव माधवराव पाटील (सर्व रा.गुरदाळ ता.उदगीर)