आशाताई बच्छाव
नगर परिषद कंत्राटदार संतोष लांजेवार यांच्यावर गुन्हा दाखल; पोलिस कारवाईला सुरुवात
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)तुमसर नगर परिषदेच्या सहायक नगररचनाकाराला फोनवरून धमकी दिल्याच्या गंभीर प्रकरणात नगर परिषद कंत्राटदार संतोष लांजेवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे नगर परिषदेतील कंत्राटदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटना, भंडारा यांनी पोलिस निरीक्षक, तुमसर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०.४५ वाजता संतोष लांजेवार यांनी नगररचनाकार अश्विन सोमकुंवर यांना मोबाईलवरून अभद्र अपमानास्पद भाषा वापरून धमकी दिली. “आपण अधिकारी नाहीत, आपण नागपूरला राहता, तिथे येऊन बघतो,” अशा स्वरूपाची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
कंत्राटदाराविरोधात गंभीर आरोप
या घटनेमुळे अश्विन सोमकुंवर आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला असून, यापूर्वीही कंत्राटदार लांजेवार यांच्या वर्तणुकीबाबत तक्रारी आल्याची माहिती मिळत आहे. नगर परिषद प्रशासनाकडे विविध विकासकामांशी संबंधित ठेके असलेल्या लांजेवार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संघटनेचा दबाव, पोलिसांची कारवाई
संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर, पोलिसांनी याप्रकरणी तातडीने चौकशी करून लांजेवार यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कंत्राटदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याची संघटनेची मागणी
नगर परिषदेमार्फत लांजेवार यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे आणि भविष्यात त्यांना कोणतेही कंत्राट दिले जाऊ नये, अशी जोरदार मागणी कर्मचारी संघटनेने केली आहे. नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना धमकी देणे हा गंभीर गुन्हा असून, प्रशासनाने यावर कठोर पावले उचलली पाहिजेत, अन्यथा कामकाज बंद पाडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
——@——
लांजेवार यांच्याविरोधात चौकशी सुरू
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, लांजेवार यांचे पूर्वीचे रेकॉर्ड आणि इतर तक्रारी देखील तपासल्या जात आहेत. या प्रकरणी पुढील काही दिवसांत आणखी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.