आशाताई बच्छाव
घानखेडा येथील माजी सैनिक श्री अजबराव लहाने यांची सेवानिवृत्तीबद्दल मिरवणूक
दिनांक 11/02/2025
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
सविस्तर वृत्त असे की घानखेडा (ता.जाफराबाद) येथील अजबराव लहाने हे जवान भारतीय सैन्य दलात 24 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात व उत्साहात स्वागत केले.श्री अजबराव लहाने यांचे सर्वप्रथम माहोरा येथे आगमन होताच तेथे घानखेडा, माहोरा येथील नवतरुण आणि परिसरातील सर्व माजी सैनिक यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत केले. त्यानतंर श्री अजबराव लहाने साहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन केले. माहोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून त्यांचे डीजे वाजत गाजत घानखेडा नगरीपर्यंत नेण्यात आले. श्री अजबराव लहाने यांचे गावात आगमन झाल्यावर डीजे लावून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पाटील दळवी यांनी आपल्या भाषणातून युवा वर्गाला प्रेरणा देत भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात देशाचे संरक्षण करणारे जवान भारत मातेचे भूषण असतात असे सांगितले. अशा सैनिकांचा ज्या त्या गावांना अभिमान असतोच गावचे सुपुत्र देशाचे रक्षण करतात याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श गावातील नव्या उमेदीच्या तरुण पिढीने घ्यावा या उद्देशाने निवृत्त सैनिकांची मिरवणूक काढून त्यांचा सन्मान करणारे गावकरी कौतुकास पात्र आहे असे ते म्हणाले .यावेळी बोलताना श्री अजबराव लहाने म्हणाले की गावकऱ्यांच्या या प्रेमाने आपण भारावलो आहोत. यावेळी जिजाऊ मित्र मंडळाचे संस्थापक संजय लहाने सर, ह.भ.प.झगरे गुरुजी यांनी सैनिका बद्दल आपले विचार मांडले. यावेळी माजी सैनिक पंडित ढाले,पंडित डुकरे, विजय लहाने, सुरेश दांडगे, रमेश ढाले ,गणेश डाले, गणेश भुतेकर,गणेश इंगळे, विठ्ठल दांडगे, प्रभाकर वाघ, किरण डुकरे, मधुकर रगड यांच्यासह माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय बोराडे यांनी केले व आभार परशुराम ढाले यांनी मानले.