आशाताई बच्छाव
दारूच्या नशेत आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील घटना…….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे एका युवकाने दारूच्या नशेत स्वतःच्या ५५ वर्षीय आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविस्तर वृत्त अशे की संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील एका युवक महाप्राशन करून घरी आला आणि त्याच्या आईला, ‘तू घातलेली साडी मी आणलेली आहे, ती काढून दे, नाहीतर तुला आणि साडीला पेटवून देईन,’ अशी धमकी दिली. आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतापाच्या भरात त्याने तिला प्रत्यक्ष पेटवून दिले. या आगीत पीडित महिलेचे पाय आणि तळपाय गंभीररीत्या भाजले असून, तिला तातडीने उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
यासंदर्भात तामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी गौरव अरुण देशमुख हा दारूच्या व्यसनाचा आहारी गेलेला आहे. पीडित महिलेचे पती अरुण भीमराव देशमुख यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ (१), ३५२, ३५१(२), (३) अंतर्गत गुन्हा दाखल केला.