आशाताई बच्छाव
प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी माहिती अधिकार कायदा शिका – अब्राहम आढाव
पुणे, सुर्यकांत भोर प्रतिनिधी: शासनाच्या कारभारात पारदर्शकता निर्माण करून भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचे परिपूर्ण ज्ञान घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा प्रशिक्षक श्री. अब्राहम आढाव यांनी केले.
ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या वतीने श्री. बाळासाहेब ठाकरे कलादालन, स्वारगेट येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 यावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक ८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या ४५ प्रशिक्षणार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. अब्राहम आढाव म्हणाले, आपण “या देशाचे खरे मालक नागरिक आहेत. शासनाचा कारभार लोकांच्या करातून चालतो, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी माहिती अधिकार कायद्याचे पूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. कायदा शिकल्याशिवाय कायद्याने लढा देता येणार नाही.”
नागरिकांनी शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि प्रशासनावर पारदर्शकता आणण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करावा.”
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी विकास सातारकर, तुषार भिसे, सचिन तापकीर, गिरीश झगडे, सचिन परदेशी, अंकुश नरवडे आणि गणेश आवटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक फ्रान्सिस पिंटो पुणे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. विकास सातारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
—