आशाताई बच्छाव
2.42 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, बोईसरमध्ये मोठी कारवाई
पदवीधराने घरातच उभारली ड्रग्ज बनवण्याची प्रयोगशाळा;
प्रतिनिधि अमोल काळे
बोईसर – काटकर पाडा कलर सिटी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत 2.42 कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. एका पदवीधर तरुणाला अटक करण्यात आली आहे, जो त्याच्या घरातच एमडी ड्रग्ज बनवत होता. या घटनेने बोईसर परिसर पुन्हा एकदा ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उच्चशिक्षित असून त्याने घरातच एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी एक अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार केली होती. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकला आणि त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 2.42 कोटी रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
बोईसर परिसरात ड्रग्ज सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक वेळा ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बोईसर आणि आसपासच्या परिसरात ड्रग्जच्या विक्री आणि सेवनाचे प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ड्रग्जच्या समस्येचे मूळ शोधून काढण्याची मागणी जोर धरत आहे.
या कारवाईमुळे बोईसर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, आणि ड्रग्जच्या या मोठ्या साठ्यामागे आणखी कोण आहे याचा शोध घेत आहेत. आरोपीचे साथीदार आणि ड्रग्जच्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.