
आशाताई बच्छाव
परळीत वाल्मीक कराड समर्थक आक्रमक; अचानक काही क्षणातच परळी शहर बंद !
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड/परळी दि.१४ जानेवारी २०२५ केज तालुक्यातील मस्साजोग खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ परळी शहरात सकाळपासूनच त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. वाल्मीक कराड यांच्या आई पारुबाई कराड यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या सुरू केला होता. या आंदोलनाच्या समर्थनार्थ शेकडो समर्थक पोलिस ठाण्यात जमा झाले होते. या अनुषंगानेच शहरात विविध ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलने केली जात होती. एका बाजूला केज न्यायालयात वाल्मीक कराड यांना हजर केले जात असताना परळीत मात्र त्यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध प्रकारची आंदोलने केली आहेत व पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तर काही नागरिकांनी व समर्थकांनी आत्मदहन करण्याचाही प्रयत्न केला. परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथील टावरच्या वर चढून त्यावरून उडी मारून आत्मदहन करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. सदरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी तारांबळ होत असल्याचे सकाळपासूनच दिसून येत असुन आता तर कराड यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. परळी शहरात बाजारपेठेमध्ये जोरदार घोषणाबाजी करत मोटरसायकल वरून हे समर्थक बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत. काही क्षणातच परळीची बाजारपेठ कडकडीत बंद झाली आहे. पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावला असला तरी आता काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. व परळी बस स्थानकाकडून इतरत्र जाणार्या सर्व बस फेऱ्या रद्द करून बंद करण्यात आल्या असून कौडगाव ते कानडी या बसवर अज्ञात व्यक्तींनी जोरदार दगडफेक करून महामंडळाच्या बसचे नुकसान करण्यात आले. आज दि.१४ जानेवारी रोजी मकर संक्रात सण असल्यामुळे परळी तालुक्यातून वान देण्यासाठी, देवदर्शनसाठी प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर व जगमित्र नागा मंदिर परिसरात महिलांची अलोट गर्दी असते. बाहेर गावावरून आलेले नागरिक व बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकांना समस्या निर्माण झालेली आहे. परळी बस स्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरलेली असून परळी शहरातील बाजारपेठ काही क्षणातच कडकडीत बंद झाली आहे.