आशाताई बच्छाव
पैसा धन अनेकांकडे आहे पण गरजुंना मदत करण्याचे औदार्य मात्र एखाद्याकडेच
असते- जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, दि. १९(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)- जालना शहरातील प्रसिध्द उद्योजक घनश्याम गोयल
यांनी शांतीनिकेतन विद्या मंदिर या शाळेस सदिच्छा भेट दिली असता
त्यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव
अंबेकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला. तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या
निमित्ताने शाळेतील अनेक गरजु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्याचे
वाटप करण्यात आले.
यावेळी घनश्याम खाकीवाले, बाला परदेशी, संस्थेचे संचालक अश्विन अंबेकर
यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की,
पैसा धन अनेकांकडे मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु त्याच्यातून गरजवंतांना
मदत करण्याचे औदार्य उद्योजक घनश्याम गोयल यांच्यासारख्या एखाद्याकडेच
असते. जालना शहरातील अनेक सामाजिक उपक्रम क्रिडा स्पर्धा यासह अनेक
गरजवंतांना मदत करण्याचे काम घनश्याम गोयल करीत असतात. त्यांच्यासारखे
शांत संयमी व उमदं व्यक्तीमत्व हे आपल्या शहराचे वैभवच आहे. घनश्याम गोयल
यांनी आपल्या उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करुन
दिला. याप्रमाणे आपल्या उत्पन्नातील किमान १० टक्के वाटा सामाजिक
उपक्रमासाठी प्रत्येकाने खर्च केल्यास मोठ्या प्रमाणावर गरजुंना मदत
होईल, असेही अंबेकर बोलतांना म्हणाले.
यावेळी उद्योजक घनश्याम गोयल यांनी शांतीनिकेतन विद्या मंदिर शाळेच्या
प्रगतीचे व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी मोठी
स्वप्ने पाहून ती साकारण्यासाठी सदैव प्रयत्नशिल रहावे, असे आवाहन गोयल
यांनी केले.